नाशिक : राज्याच्या गृह खात्याची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे, ते दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि.८) नाशिक दौऱ्यावर आले असता दिंडोरी रस्त्यावर झळकलेल्या पोलिसांविषयीच्या प्रबोधनपर फलकांची दिवसभर चर्चा होती. मुंबई, नाशिक येथील पोलिसांवर झालेले हल्ले, धक्काबुक्की, जिवे मारण्याचा प्रयत्न यांसारख्या घटना ताज्या असतानाच शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा झाला आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये आढावा बैठकीसाठी त्यांनी हजेरी लावली. दरम्यान, त्यांचा ‘व्हीव्हीआयपी कॅनव्हॉय’ ज्या रस्त्यावरू न मार्गस्थ झाला त्या दिंडोरी रस्त्यावरच जनतेत पोलिसांविषयीचे प्रबोधन घडावे, अशा आशयाचे फलक संबंधित पोलीस ठाण्याच्या नावाखाली झळकल्याचे चित्र होते. या फलकांमधून जनतेचे प्रबोधन क रण्याचा प्रयत्न असला तरी ऐन फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच सर्वप्रथम दिंडोरी रस्त्यावर झळकविलेल्या फलकांची दिवसभर चर्चा होती. ‘पोलिसांच्या संरक्षणाविषयी ठोस भूमिका घ्या’ अशी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना या फलकांच्या माध्यमातून आठवण करून देण्यात आल्याची चर्चा रंगली होती.मुंबईमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकास पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला, तर एका पोलीस कर्मचाऱ्यावर वरळीमध्ये थेट नाकाबंदीदरम्यान दुचाकी अंगावर घातल्याचा प्रकार घडला. तसेच तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्येही नाकाबंदीदरम्यान शालिमार येथे एका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली आणि टाकळी-तपोवन रस्त्यावर पोलिसांच्या अंगावर रिक्षाचालकाने रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला. अशा या घटनांमुळे समाजाची सुरक्षा ज्यांच्या हाती आहे, ती ‘खाकी’ असुरक्षित झाल्याची भावना पोलीस दलात निर्माण झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नाशिकमधून परतत नाही तोच नाशिकमध्येच आणखी एका पोलिसावर हल्ला झाला. नाशिकमध्येच पोलिसावर हल्ला करण्याची ही तिसरी घटना आहे. (प्रतिनिधी)
‘पोलीस तुमचा सखा... त्याचा आदर राखा’
By admin | Published: September 09, 2016 1:57 AM