लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या पार्क करणाऱ्या वाहनाचालकांविरुद्ध वाहतूक शाखेने मोहीम सुरू केली आहे. दुपारच्या सुमारास महात्मा गांधीरोडवर सुमारे ४० पेक्षा अधिक वाहनांना जॅमर लावण्यात येऊन वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाहतूक शाखेने फौजफाट्यासह महात्मा गांधी रोडवर अचानक कारवाई सुरू केली. ‘नो पार्किंग’मध्ये उभी असलेली दुचाकी, चारचाकी तसेच रस्त्यातच चारचाकी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी हिसका दाखवत दंडात्मक कारवाई केली. ‘नो पार्किंग असतानाही वाहने या ठिकाणी उभी करण्यात आल्याने या सर्व वाहनांना जॅमर लावण्यात आले. महात्मा गांधी रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा बाजारपेठ परिसर असून, या मार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. संपूर्ण बाजारपेठ असल्यामुळे पार्किंगचा प्रश्न नेहमीच उद्भवतो त्यामुळे या ठिकाणी डाव्या आणि उजव्या बाजूला सम आणि विषम तारखेला पार्किंग करण्यात आली आहे. असे असतानाही वाहनधारक नियमांचे पालन न करता कुठेही वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. विशेषत: चारचाकी वाहनांमुळे कोंडी मोठ्या प्रमाणात होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोंडीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी आज धडक मोहीम राबवित बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली. मुख्य रस्ता एम.जी.रोड तसेच वकीलवाडीतील रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. जे चालक गाडीतच होते त्यांच्याकडून जागेवरच दंड वसूल करण्यात आला. या मार्गावर उभ्या असलेल्या जवळपास चाळीपेक्षा अधिक वाहनांना जॅमर लावण्यात आले.
बेशिस्त पार्किंगला पोलिसांचे ‘जॅमर’
By admin | Published: June 30, 2017 12:42 AM