नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरी भागामध्ये रविवारी (दि. २९) पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुमारे एक लाख ३४ हजार ९५७ बालकांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान संपूर्ण शहरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सुमारे १ लाख ८५ हजार ९९४ बालकांचे लक्ष्य महापालिकेच्या आरोग्य विभागाने डोळ्यासमोर ठेवले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी पालिकेने ७३ टक्के मोहीम यशस्वी केली असून, उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत सलग पाच दिवस पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहे.पोलिओमुक्त भारत घडविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पोलिओ लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत २९ जानेवारी आणि २ एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर पोलिओ लसीकरण अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रविवारी सकाळी आठ वाजता शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
दीड लाख बालकांना पोलिओ डोस
By admin | Published: January 30, 2017 12:10 AM