नाशिक : कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीला साधूंच्या आखाड्यांआधीच रामकुंडात शाहीस्नान केल्याने टीका झाल्यानंतरही आज तिसऱ्या पर्वणीला महापौरांसह अन्य पुढाऱ्यांनी तोच कित्ता गिरवला. दुसरीकडे पालकमंत्र्यांनी मात्र जबाबदारीचे भान राखत तिन्ही आखाड्यांचे स्नान झाल्यानंतरच डुबकी मारत समजूतदारपणा दाखवला.कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीपासूनच रामकुंडात स्नान करणारा ‘राजकीय आखाडा’ चांगलाच चर्चेत राहिला. पहिल्या पर्वणीला अखेरच्या निर्मोही आखाड्याचे स्नान होण्यापूर्वीच पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह स्थायी सभापती, शिक्षण सभापती, माजी महापौर आदि पुढाऱ्यांनी रामकुंडात स्नान केले. तेव्हा या मंडळींवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे दुसऱ्या पर्वणीत सर्वांनीच गेल्या वेळची चूक सुधारत तिन्ही आखाड्यांचे स्नान झाल्यानंतरच रामकुंडात उतरणे पसंत केले होते.दरम्यान, शुक्रवारी तिसऱ्या पर्वणीला मात्र महापौरांसह खासदार हेमंत गोडसे, मनसेचे सरचिटणीस बाळा नांदगावकर, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले आदिंनी दिगंबर आखाड्याच्या प्रमुख महंतांचे स्नान होण्यापूर्वीच रामकुंडात डुबकी मारली. एवढेच नव्हे, तर महापौरांनी काठावर उभ्या असलेल्या पालकमंत्र्यांनाही स्नानासाठी येण्याचे आवाहन केले; मात्र पालकमंत्री महाजन यांनी अद्याप दोन आखाड्यांच्या महंतांचे स्नान बाकी असल्याचे सांगत त्यांना नकार दिला; त्यानंतरही रामकुंडात पुढाऱ्यांच्या डुबक्या सुरूच राहिल्या. महापौरांनी तर निर्वाणी आखाड्याचे श्री महंत धरमदास यांच्यासह अनेक साधूंना आपल्या खांद्यावर उचलून घेत शक्तिप्रदर्शनही घडवले. दिगंबर व निर्मोही अशा दोन्ही आखाड्यांच्या प्रमुख महंतांचे स्नान होईपर्यंत सदर मंडळी रामकुंडातच होती. सर्व आखाड्यांचे स्नान आटोपल्यावर मात्र पालकमंत्र्यांनीही स्वत:ला रामकुंडात झोकून दिले आणि स्नानाचा आनंद लुटला. नंतर पालकमंत्री व महापौरांत पाण्यात सूर मारण्यावरूनही स्पर्धा रंगली, तर कधी दोघांनी एकमेकांना हात देत ‘कोण किती पाण्यात’ याचाही प्रत्यय दिला. राजकीय आखाड्याच्या या स्नानाने उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. (प्रतिनिधी)
राजकीय आखाड्याची डुबकी
By admin | Published: September 18, 2015 11:58 PM