लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांकडून मतदारसंघातील कामांचे श्रेय घेण्यास सुरुवात झाली असून, त्यानिमित्ताने निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापायला लागले आहे. या श्रेयवादात कोणाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तर पाण्याच्या प्रश्नाची आठवण होऊ लागली असून, त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जोमाने सुरुवात झाल्या असून, विद्यमान प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघाची बांधणी करण्यात व्यस्त झाले आहेत. त्यासाठी त्यांना मतदारसंघातील प्रश्नांची व समस्यांचीही आठवण होऊ लागली आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर केलेले प्रयत्न व त्याला मिळालेले यशाचे गोडवेही समर्थकांकडून गायले जात आहेत. त्यातूनच कामांचे श्रेय घेण्याची चढाओढ लागली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दोनच दिवसांपूर्वी मतदारसंघातील सूत गिरणीकडे जिल्हा बॅँकेचे थकलेल्या कर्जाच्या विषयावरून ठिय्या आंदोलन केले. या थकीत कर्जाच्या निमित्ताने भुसे यांनी थकबाकीदार असलेल्या प्रतिस्पर्धी हिरे कुटुंबीयांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे माकपाचे आमदार जिवा पांडू गावित यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी कळवण येथे आदिवासी, शेतकऱ्यांचा मोर्चा काढून दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या दरबारी मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी या विषयांबरोबरच, सटाणा शहराला थेट जलवाहिनीने पाणीपुरवठा करणाºया योजनेला विरोधही केला आहे. येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनीदेखील मांजरपाडा प्रकल्पाचे विधानसभा निवडणुकीपूर्वी जलपूजन आयोजित केले आहे. गुजरातला जाणारे महाराष्टÑाचे पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून अडवून दिंडोरी, चांदवड, निफाड, नांदगाव, येवला या मतदारसंघांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाल्याचे सांगायला भुजबळ विसरले नाहीत. आघाडी सरकारच्या काळात काम सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम युती सरकारच्या काळात पूर्ण झाले असले तरी, भुजबळ यांनी जलपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचे पाहून सत्ताधारी पक्षानेही आता शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जलपूजनाचे आयोजन केले आहे. अन्य आमदारांकडून आपापल्या मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणाची घाई सुरू झाली आहे.