नाशिक : राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजप-सेनेबरोबर युती केलेल्या दलित संघटना व पक्षांचा मतांसाठी वापर करून प्रस्थापित पक्षांनी दलित नेत्यांचा पॉलिटीकल एन्काउंटर केला असून, या निवडणुकीत आठवले, कवाडे, आंबेडकर गटाचे उमेदवार निवडून न आल्यामुळे ते स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पत्रक काढून ही बाब स्पष्ट केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दलित संघटना व पक्षांशी सेना, भाजप व दोन्ही कॉँगे्रसने काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी केली. दलित संघटनांना बोटावर मोजण्या इतपत जागा देऊन त्यांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले गेले. प्रत्यक्षात या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दलित संघटना, पक्षांशी युती करणाऱ्या पक्षांचे उमेदवार निवडून आले, परंतु दलित उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. उदाहरणच द्यायचे तर मुंबई महापालिकेत रामदास आठवले यांनी भाजपासोबत निवडणूक युती केल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कुठल्याही गटाचा प्रतिनिधी महापालिकेत निवडून येऊ शकला नाही. दुसरीकडे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नागपूर या बालेकिल्ल्यातही एकही जागा निवडून आणता आली नाही. तर प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातही कोणताही करिष्मा होऊ शकलेला नाही. हा सारा प्रकार पाहता, सत्तेचे गाजर दाखवित सर्वच प्रस्थापित पक्षांशी पद्धतशीरपणे दलित नेत्यांचे ‘पॉलिटीकल एन्काउंटर’ केले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेला पराभव पाहता, आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने मोठी नामुष्की ठरली आहे.
दलित नेत्यांचे ‘पॉलिटीकल एन्काउंटर’
By admin | Published: March 03, 2017 1:29 AM