नाशिक : पाकिस्तानचा काश्मीरवर कुठल्याहीप्रकारे हक्क नाही. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरसुद्धा (पीओके) हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे भारताने आपल्या राज्यात केलेल्या अंतर्गत बदलाविषयी बोलण्याचा पाकिस्तानला काही अधिकार नाही; मात्र हा तेथील सरकारचा राजकीय स्वार्थ असून, पाकिस्तानमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ‘काश्मीर’ला धगधगते ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कलम-३७० व ३५ अ रद्द झाल्यापासून सुरू झाल्याचा आरोप माजी सैन्याधिकारी कॅप्टन अजित ओढेकर यांनी केला.रोटरी हेल्थ सोसायटीच्या वतीने गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात शनिवारी (दि.२४) ‘काश्मीर येथील कलम ३७० व ३५अ’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ओढेकर बोलत होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, जी. एम. जाधव, जयवंत पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ओढकेर यांनी काश्मीरचा स्थापनेपासूनचा इतिहास, विलनीकरणाचा इतिहास, काश्मीरमधील राजकीय स्थित्यंतरे आणि इतिहासाचा टप्प्याटप्प्याने आढावा घेतला. यावेळी ओढेकर म्हणाले, कलम ३७० व ३५(अ) रद्द झाल्यामुळे काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले. भारताशी काश्मीरचे नाते अधिक मजबूत झाले. भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ आता येथील जनतेला मिळणार आहे. मागील ७० वर्षांत कोट्यवधी रुपये सरकारने काश्मीरसाठी दिले; मात्र भ्रष्टाचार बोकाळल्याने काश्मीर विकासाच्या वाटेवर गतिमान होऊ शकले नाही, असेही ओढेकर म्हणाले.पाकिस्तान सक्षम नाहीभारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी पाकिस्तान सक्षम नाही. पाक केवळ युद्धाच्या वल्गना करू शकतो आणि भारताविरोधी गरळ ओकू शकतो. युद्धात पाकिस्तान दहा दिवसही टिकू शकणार नाही, असा दावा ओढेकर यांनी यावेळी केला. युद्धाची भाषा ही पाकिस्तानलाच शोभते. भारताने नेहमीच युद्धजन्य परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले आहेत. सीमेवर पाकच्या कुरघोड्या पाक करू शकतो, असे ओढेकर यावेळी म्हणाले.
‘पाक’च्या वल्गना राजकीय स्वार्थ : अजित ओढेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:21 AM