नाशिक : आतापर्यंत चांगली असलेली अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) विश्वासार्हता धोक्यात आली असून, त्यांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्यामुळे त्यांची प्रतिमाही मलीन होऊ लागली आहे. राजकीय फायद्यांसाठी ईडीचा वापर करणे अयोग्य असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे ईडीच्या कार्यवाहीला निश्चितपणे सामोरे जातील, असा विश्वासही त्यांनी नाशिक जिल्हा दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी भवनातील कार्यक्रमात व्यक्त केला. जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे आमदार पवार यांनी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले विरोधकांकडून समाजमाध्यमांचा वापर हा सरकारवर टीका करण्यासाठी आरोप करण्यासाठीच केला जात आहे. लहानसहान विषयाला वेगळे वळण देऊन समाजमाध्यमांवर त्याचा गवगवा केला जातो. त्यामुळे मूळ प्रश्नांपासून लक्ष दुसरीकडे वळविण्याचे विरोधकांचे प्रयास असले, तरी ते सफल होऊ दिले जाणार नाहीत, असे ते म्हणाले. केंद्र शासनाकडून राज्यशासनाला हक्काच्या जीएसटीचा वाटाही दिला जात नसून, केंद्राने अनेकदा शेतकऱ्यांचीही फसवणूक केली आहे. महाविकास आघाडी लोकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी नमूद केले. आमदार नियुक्तीत विलंबावर आक्षेप राज्यातील आमदारांच्या नियुक्तीबाबत खूपच विलंब होत असून, ही कृती आक्षेपार्ह असल्याची टीका आता सामान्य नागरिकांकडूनही होऊ लागली आहे. देशातील प्रत्येकाने संविधानाचा सन्मान करून, त्याप्रमाणेच पदाचा उपयोग करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
ईडीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप: रोहित पवार यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 1:30 AM