नाशिक : अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, कापूस यासोबतच पालेभाज्या , फळभाज्या आदि पिकांचे अगणीत नूकसान होऊन शेतकरी कोलमडला आहे. अशा स्थितीत शेतकºयांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित अशताना सध्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या कारुण्याचा बाजार मांडला आहे. तर प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त गावांचे सरसकट पद्धतीने अंदाजे पचंनामे करून भ्रामक आकडेवारी दिली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले नूकसान हे शासकीय आकडेवारीच्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे या आकडयांची पडताळणी केल्यास समोर येईल,असे मत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या संकटाबाबत कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ. डॉ. गिरीधर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.
प्रश्न- अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या खरीपाचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल?पाटील - मान्सूच्या आगमनानंतरही काही भागात दुष्काळाच्या झळा कायम होत्या. चांगला पाऊस झाला तिथे आलेले पिक परतीच्या पावसाने पूर्ण वाया गेल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदतही राज्यात सरकारच नसल्याने अद्याप मिळू शकलेली नाही. शासकीय यंत्रणातर केवळ सातव्या वेतन आयोगासाठीच काम करतात की काय असा प्रश्न निर्माण होतो. अतिवृष्ट बाधित गावांमध्ये सरसकट नुकसान दाखविल्याने प्रत्यक्ष वास्तिविकता समोर येत नाही.
प्रश्न- अवकाळी संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करणे गरजेचे आहे?पाटील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या प्रयत्नांमध्ये शेतकरी वगळता इतर सारे घटक सक्षम व पुष्ठ होत जातात शेतकरी तसाच राहतो. आणि इतर घटक मात्र त्याच्या कारुण्याचा बाजार मांडत त्यांचा स्वार्थ साधत राहतात. त्यामुळे अशा संकटांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यांनी आपला शत्रू आणि मित्र ओळखण्याची गरज आहे. राजकारणासह, बाजार समिती, अडते, व्यापारी यासर्वंच्या बाबतीत हाच निकष लावण्याची गरज आहे.
मुलाखत -नामदेव भोर