सुरगाणा : राजकीय स्वार्थापोटी गावांचा विकास होत नसल्याने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर त्यात राजकारण चालणार नाही. त्यासाठी संपूर्ण गावाची एकजूट असावी लागते, असे प्रतिपादन नाम फाउण्डेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. तालुक्यातील बा-हे येथील जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नाम फाउण्डेशन राजकीय नसल्याने सर्व कामे पूर्ण होतील. आज नाना पाटेकरदेखील येणार होते. महाराष्ट्रात नाम फाउण्डेशनकडून कार्य सुरू आहे. व्यस्त कामामुळे ते येऊ शकले नाहीत. यावेळी अनासपुरे म्हणाले की, मला माफ करा पण टिळा लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर माझा विश्वास नाही. त्यावर काही उदाहरणे त्यांनी दिली. गावोगावी शिक्षणाची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत विकास घडून येणार नाही. आयुष्याचे सार कळल्यावर जीवन सुखमय व्यतीत होते. खास शैलीत बोलताना अनासपुरे यांनी उपस्थित सर्वांनाच खळखळून हसवत ज्यावेळी मुली शिकतील तेव्हा समाजाचे कल्याण होईल, असे सांगून मुलांना शिक्षण घेऊन पुढे जाण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनासपुरे यांनी नामतर्फेपाच लाख रुपयांची मदत स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजला जाहीर केली. यावेळी गोपाळराव धूम नामकडून उपस्थित मुंबईचे उपायुक्त यशवंत मोरे व प्राचार्य तथा कवी राजेंद्र उगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्नल सहानी, राजीव सावंत, अमित खळे, सोनालीराजे पवार, भारती पवार, इंद्रजित गावित, बी.पी. महाले, कुसळकर, मनीषा महाले, नगरसेवक दीपक थोरात, रमेश थोरात आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय स्वार्थापोटी गावांचा विकास होत नाही : मकरंद अनासपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:37 AM