नाशिक : सण, उत्सवासाठी खर्चबंदी करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. यापुढे गणेशोत्सवासह अन्य महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्याही बंद करणार काय? असा प्रश्न शिवसेनेने केला असून, राष्टÑवादीनेदेखील निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागताची तयारी केली आहे. तर इदगाह मैदानावरील मंडपासाठी खर्च करण्यास नकार देणारी महापालिका याच मैदानावर व्यावसायिक प्रदर्शने भरवून पैसा कसा वसूल करते, असा प्रश्न केला आहे. महापालिकेने पालखी स्वागत आणि रमजान ईदसाठी मंडप नाकारल्यांनतर राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, शिवसेनेने याबाबत महापालिकेतील सत्तारूढ भाजपालाच टार्गेट केले आहे. भाजपाच्या काळातच शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यात आली तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या दालनात देवादिकांच्या प्रतिमांवर बंदी आणण्यात आली. आता सण, उत्सवावर बंदी म्हणून गणेशोत्सवात महापालिकेचा मानाचा गणपती यंदापासून नसणार काय, तसेच महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांना देखील खर्च केला जाणार नाही का? असा प्रश्न विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला. भाजपा नगरसेवक जगदीश पाटील यांनीदेखील याबाबत पालखी सोहळ्याला आणि रमजानसाठी सुविधा देण्याची मागणी केली आहे. नाशिक शहर धार्मिक ठिकाण असून, याठिकाणी नवरात्रोत्सवात कालिका माता यात्रा भरते, त्यावेळी महापालिका स्टॉलधारकांकडून भाडेदेखील वसूल करीत असते, त्यामुळे अशा सर्व सण, उत्सवांसाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा तसेच शहरातील सण, उत्सवांसाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. संत वारकरी व पालखीचे स्वागत करण्यास नाशिक महापालिकेने नकार दिल्याने त्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचे स्वागत करणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या परंपरेस महापालिकेच्या भूमिकेमुळे खंडित पडण्याचे चिन्हे आहे. राज्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका वारकरी संप्रदायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात. परंतु नाशिक महापालिकेच्या भूमिकेमुळे या वर्षांपासून स्वागताच्या परंपरेस तडा जाणार आहे. संत वारकरी व पालखीचे स्वागत करण्यास नाशिक महापालिकेने नकार दिल्याने महापालिकेचा निषेध नोंदवत सामाजिक प्रबोधनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वखर्चाने संत निवृत्तिनाथ महाराज पालखी व वारकºयांचे स्वागत करेल असे ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने याबाबत धोरण स्पष्ट करावे तसेच पालखी स्वागताचा खर्च करता येत नसल्याचेदेखील सांगितल्यास भाजपा खर्च करेल असेही ते म्हणाले. स्थायी समितीचे सदस्य सय्यद मशीय यांनीदेखील मनपाकडे रमजाननिमित्त दरवर्षाप्रमाणे ताडपत्रीचा मंडप टाकण्याची विनंती केली आहे. इदगाह मैदान हे देखभालीसाठी महापालिकेच्या ताब्यात असतानादेखील त्यावर महापालिका सर्कस, प्रदर्शनासारखे कार्यक्रम घेत असते आणि त्यातून करदेखील मिळविते; मात्र येथे नमाजपठण होत असताना मंडप का नाकारला जात आहे ? असा प्रश्न केला असून, दि. १६ जून रोजी नेहमीप्रमाणे मंडप, तसेच पाणी पुरवण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.महापौरांची केवळ विनंतीमहापालिकेतील सत्तारूढ भाजपा यासंदर्भात काय भूमिका घेते याकडे लक्ष असताना महापौर रंजना भानसी यांनी यासंदर्भात आयुक्तांना केवळ विनंतीपत्र देऊन पालखी स्वागत सोहळा तसेच रमजान ईद स्वागत कक्षासाठी खर्च करण्याची विनंती केली आहे. सत्तारूढ गटानेच इतकी साधी भूमिका घेतल्याने विरोधकांना मात्र टीकेची संधी मिळाली आहे. दुसरीकडे भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
सण, उत्सव खर्चबंदीवरून राजकीय रणकंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:23 AM