श्याम बागुल।नाशिक : कोरोनाविषयी असलेले अज्ञान, महापालिकेची उदासीनता व लोकप्रतिनिधींमध्ये या प्रश्नावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे मालेगावमध्ये कोरोनाने शंभरी गाठून दशकभर लोकांचे बळी घेतले आहेत. यंत्रमाग हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे दर दोन व्यक्तींमागे एका व्यक्तीला दमा, टीबीसारख्या रोगाने पछाडलेले व त्यातच दाट लोकवस्ती असल्याने कोरोनाला हातपाय पसरण्यासाठी आपसुकच मिळालेली मोकळीक पाहता मालेगाव शहराला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासन, प्रशासनाला हातात हात घालून काम करावे लागणार आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिला रुग्ण सापडल्यानंतर गावोगावच्या ग्रामपंचायतींनी कोरोनाच्या धास्तीने स्वच्छता मोहीम, ग्रामस्थांना सॅनिटायझरचे वाटप, सामाजिक अंतर राखण्याचे प्रयत्न केले. प्रत्येक नवख्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणीची सक्ती करण्याबरोबरच, शक्यतो गर्दी टाळण्यासाठी आठवडे बाजार व यात्रा, सणोत्सवांना मुरड घातली. या काळात मात्र मालेगाव महापालिका सुस्त होती. नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी संदेश देण्यासही महापालिका अपयशी ठरली. परिणामी मालेगावात परदेशातून, बाहेरगावाहून आलेल्यांना मोकळीक मिळाली. उपचारासाठी खासगी डॉक्टर नसल्याने साऱ्यांची गर्दी शासकीय रुग्णालयात होऊ लागली. त्यातून सामाजिक अंतर पाळण्याचे बंधन झुगारण्यात आले. कोरोनाची प्राथमिक लक्षणांसारखेच दमा, न्यूमोनियाचे रुग्ण पाहून आरोग्य विभागाने अशा संशयित रुग्णांना थेट उपचारार्थ दाखल करण्यास सुरुवात केली. अशा रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले असता, आरोग्य यंत्रणा फक्त रुग्णालयात दाखल करते, उपचार मात्र करीत नाही अशी भावना रुग्णांमध्ये निर्माण झाली व त्यातून त्यांचा रोष वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निघू लागला, तर दुसरीकडे वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण अत्यवस्थ होऊन दगावण्याच्या घटना घडल्या.----------कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना राबविण्याऐवजी समाजमाध्यमांनी त्याला दिलेली हवा पाहता शहराचे पूर्व-पश्चिम अशा दोन भागांत विभाजन झाले व त्यातूनच आरोग्य यंत्रणाही वाटली गेली. अशातच कोरोनाच्या भीतीने शहरातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले.महापालिकेने कोरोनाच्या जनजागृतीत कुचराई केल्याची तक्रार केली जात असतानाच, त्याचवेळी मालेगावातील राजकीय वैमनस्यही उफाळून आले. महापालिकेची सत्ता विशिष्ट पक्षाच्या हाती, तर मालेगावचे आमदार विशिष्ट विचारसरणीचे. त्यामुळे दोघांमध्ये चढाओढ सुरू होऊन परिणामी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयाला शिवीगाळ, मारहाण करण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेचा रोष संपूर्ण शहरालाच महागात पडला आहे. महापालिकेच्या सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी शहरातील पश्चिम भागात वैद्यकीय सेवा देण्यास जिवाच्या भीतीने नकार देण्यास सुरुवात केली असून, शासकीय रुग्णालयात होणारी गर्दी व त्यातून सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे पाहून ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संशयितांचा उपचारासाठी विशिष्ट रुग्णालयात दाखल करण्याचा होत असलेला आग्रह व आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा पाहता लक्षात घेता, शहरातील कोरोना लवकर आटोक्यात येण्याची चिन्हे नजरेस पडत नाहीत.
उदासीनतेसह राजकारण ठरले कोरोनाला पोषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:55 PM