वसाका भाडे तत्वावर चालविण्यास देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. वसाकाच्या प्राप्त परिस्थितीनुसार व सहवीजनिर्मिती प्रकल्पातूनच येणाऱ्या पैशांच्या माध्यमातून वसाकाचे सर्व कर्ज अवघ्या सात ते आठ वर्षात फिटणार असताना वसाका २५ वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास देणे म्हणजे सभासदांची, ऊस उप्तादकाची धूळफेक करण्याचा डाव आहे. यासाठी सर्व सुज्ञ, जाणकार सभासदांनी व ऊस उत्पादकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन तीव्र लढा उभारावा व वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी ठेवावी , असे आवाहन आहेर यांनी केले. मागील तीन वर्षात दोनवेळा गळीत हंगाम चालवीत असताना प्राधिकृत मंडळ व कार्यकारी संचालकाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कारखान्यावर ४० कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला असून त्यास सर्वस्वी विद्यमान प्राधिकृत मंडळच जबाबदार आहे, असा थेट आरोप आहेर यांनी केला. सहकार कायद्यानुसार कोणत्याही प्राधिकृत मंडळाला प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी सत्तेत राहण्याचा अधिकार नसताना राज्य शासनाच्या मेहरबानीने गेल्या तीन वर्षांपासून हे प्राधिकृत मंडळ कारखान्याचा कार्यभार कसा पाहत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वसाका भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा महत्वाचा निर्णय ठरलेला असताना जाहीरपणे कुठेही सर्वसाधारण सभेची नोटीस प्रसिद्धीस देण्यात आलेली नव्हती तसेच घाईगर्दीत मोजक्याच व मर्जीतल्या सभासदांना बोलावून भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा ठराव एकतर्फी करून घेतला असून सदरची सर्वसाधारण सभा ही बेकायदेशीर असल्याचे आहेर यांनी सांगितले. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मोजके सक्षम ऊस उत्पादक, सभासद व हितचिंतक यांच्या माध्यमातून व स्वत:च्या मालकीची जमीन तारण देऊन चालवावा जेणेकरून कारखान्याची मालकी शाबूत राहील व कर्जही लवकरात लवकर फिटण्यास मदत होणार असल्याने याबाबत आपण मागणी केली होती. मात्र त्याबाबत हेतुपुरस्कार बोळवण करण्यात आल्याचे आहेर यांनी सांगितले.याप्रसंगी वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.
वसाका भाडेतत्त्वावर देण्यामागे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 5:51 PM