संजय पाठक
नाशिक : भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतरदेखील उभय पक्षांत एकमेकाला शह-काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक शहरातील ३६ नगरसेवक आणि साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामे दिल्याने शिवसेनेचे भाजपच्या विरोधात बंड केल्याचे राज्यभर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र, भाजपचेच अनेक ठिकाणी बंडखोर उभे असून, त्यामुळेच शिवसेनेने हे धाडस केल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर महाराष्ट्रात ३५ पैकी दहा जागांवर बंड असून त्यामुळे युतीचा ‘सामना’ कॉँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आपसातच होताना दिसत आहे.यंंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपकडे इच्छुकांची प्रचंड संख्या होती. कोणत्याही पक्षाची जागा बदलली गेली असती तर मित्रपक्षातील इच्छुकाकडून बंड अटळच होते. त्यामुळे युतीची घोषणा न करताना भाजप आणि शिवसेनेकडून थेट ए-बी फॉर्मचे वाटप करण्यात आले. परंतु त्यामुळे बंडखोरी टाळता आली नाही. या निवडणुकीत भाजपच्या वाटेला १६४ जागा आल्या असून, शिवसेनेच्या वाटेला १२४ जागा आल्या आहेत. तथाापि, विधानसभेत ‘नंबर गेम’साठी दोन्ही पक्षांचे अनेक बंडखोर उभे राहून आपसातच मित्रपक्षांचे ‘गेम’ करीत आहेत असे एकूणच राजकीय चित्र आहे.
उत्तर महाराष्ट्रात ३५ जागांपैकी दहा जागांवर बंडखोरी आहे. विशेष करून शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उभे आहेत. ज्या जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व गिरीश महाजन करतात त्यांच्या जिल्ह्यातच अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर एकमेकांसमोर उभे आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये सहकार राज्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे, चोपडा येथे शिवसेनेच्या उमेदवार लताबाई सोनवणे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी, पारोळा मतदारसंघात शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, तर पाचोरा मतदारसंघात किशोर पाटील यांच्या विरोधात भाजपच्या अमोल शिंदे यांनी शड्डू ठोकले आहेत. दुसरीकडे मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांच्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीदेखील बंडखोरी केली आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांना शिवसेनेची फूस असल्याची तक्रार आहे.
धुळे जिल्ह्यात यापेक्षा वेगळे चित्र नसून तेथेही युतीत बंडखोरी आहे. धुळे येथे शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या विरोधात भाजपचा थेट उमेदवार नाही. मात्र, अपक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्या पाठीशी भाजप असल्याची शिवसेनेची तक्रार आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव-मनमाड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य मनीषा पवार यांचे पती रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केली आहे, तर निफाड तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांच्या विरोधात त्यांचे पुतणे यतीन कदम हे अपक्ष उमेदवार असून, त्यांना भाजप आतून मदत करीत असल्याचा आरोप आहे. नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विलास शिंदे यांनी बंडखोरी केली असून, त्यांच्यासाठी सर्व शिवसेना नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे सेना आणि भाजपने इशारे दिले परंतु बंडखोरांवर कारवाई मात्र केलेली नाही.
नाशिकमधील शिवसेनेच्या बंडानंतर भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बंडखोरांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असती तर आधी धुळे, जळगाव, नाशिकमधील अन्य मतदारसंघातील भाजपच्या बंडखोरांना माघार घेण्यास सांगा, मग चर्चा करा अशी भूमिका घेण्याची शिवसेनेची तयारी होती. बहुधा त्यामुळेच भाजपने हा विषय बाजूला सारून सोबत आली तर शिवसेना अन्यथा शिवसेनेशिवाय प्रचार करण्याची भूमिका घेतली. या सर्व प्रकारांमुळे युतीशी लढाई ही कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी असण्यापेक्षा आपसातच होत आहेत की काय? असा प्रश्न आहे.