नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिराचे पाचपट वाढलेले भाडे कमी करण्यावरून आता राजकारण तापले आहे. दर कमी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेताच त्यांनी दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मुंढे आणि भाजपाचे आपसातील समझोत्यानेच हे प्रकार सुरू असून, दरवेळी भाजपाचे आमदार भेटल्यानंतरच दर कमी कसे होतात? असा प्रश्न विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला आहे.कालिदास कलामंदिर स्मार्ट झाल्यानंतर आयुक्तांनी त्याच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला असून, चार हजार रुपयांचे भाडे थेट २१ हजार अधिक जीएसटी अशाप्रकारे वाढविण्यात येणार आहे. तर वाद्यवृंदासाठी चाळीस हजार रुपयांपर्यंत दर आकारण्यात येणार आहे. यासंदर्भात कलावंतांकडून नाराजी होत असून, दर कमी करण्याचे आवाहन केले जात असताना शुक्रवारी (दि. ७) आमदार देवयानी फरांदे यांनी कलावंतांसह आयुक्तांची भेट घेतली. यावेळी फरांदे आणि कलावंतांनी दरवाढ अवास्तव असून, न परडणारी असल्याचे सांगतानाच कलावंतांनी कलामंदिरात तांत्रिक सुविधा, प्रकाश योजना, ध्वनी यंत्रणा यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिल्या. मुंबई, पुणे आणि ठाणे येथील नाट्यगृहांच्या तुलनेत हे दर जास्त असून, हौशी तसेच प्रायोगिक रंगभूमी कलावंतांना हे व्यावसायिक दर परवडणारे नाहीत, असे फरांदे यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते सदानंद जोशी, दत्ता पाटील, सचिन शिंदे, विनोद राठोड, लक्ष्मण कोकणे व अभय ओझरकर यांनी सांगितले. यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतानाच कलावंतांना परवडतील असेच दर ठेवण्याचे आश्वासन देतानाच तांत्रिक दोष दूर करू, असे सांगितले. दरम्यान, आयुक्तांनी कलामंदिराचे भाडे कमी करण्याचे आश्वासन देतानाच या विषयावरील राजकारण अधिक तापले.कलाकारांचेही राजकारणकॉँग्रेसचे गटनेते आणि नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे उपाध्यक्ष शाहू खैरे यांना कलावंत भाजपा आमदाराच्या अधिपत्याखाली आयुक्त तुकाराम मुंढे यांना भेटल्याचे रुचले नाही. दोन दिवसांपूर्वी आपण कलावंतांची बैठक घेतली, त्यावेळी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीबाबत कोणत्याही पक्षीय झेंड्याखाली न जाता कलावंत म्हणून लढण्याचे ठरले होते; मात्र आता काही कलावंतांनी आमदारांच्या नेतृत्वाखाली परस्पर चर्चा केल्याने खैरे यांनी नाराजी व्यक्त केली.
कालिदासचे दर कमी करण्यावरून राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:43 PM
महाकवी कालिदास कलामंदिराचे पाचपट वाढलेले भाडे कमी करण्यावरून आता राजकारण तापले आहे. दर कमी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेताच त्यांनी दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले.
ठळक मुद्देमुंढे करणार फेरविचार : बोरस्ते यांची भाजपावर टीका