नाशिक : जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २० ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सरपंचपदासाठी बुधवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या निवडणुकीतही राखीव जागांवरून उमेदवारी करू पाहणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक जागांवर उमेदवारी अर्ज दाखलच झालेले नाहीत. तर काही ग्रामपंचायतींमध्ये एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने सुमारे १०६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.या निवडणुकीत त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाच, देवळा, येवला, बागलाण, निफाड व नाशिक तालुक्यात प्रत्येकी एक व इगतपुरी तालुक्यात १५ अशा २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह २४६ जागा आहेत. त्यातील ४९ जागांवर एकही उमेदवाराने नामांकन दाखल केले नाही. तर गावोगावी झालेल्या राजकीय व सामाजिक समझोत्याने १०६ जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. तीन जागांवर सरपंचपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे आता २० ग्रामपंचायतींच्या ९१ जागांसाठी बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सरपंचपदासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील होलदारनगर, इगतपुरीतील बोरटेंभे, दिंडोरी तालुक्यातील टाके घोटी, वनारवाडी, ननाशी या ग्रामपंचायतींत एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केलेले नाही.
जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २० ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:36 AM