नाशिक : श्री गणेश सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १२ संचालक पदांच्या जागांसाठी उद्या (दि.२१) मतदान होत असून, सोमवारी (दि.२२) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. गणेश सहकारी बॅँकेसाठी शरद कोशिरे यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश सहकारी बॅँक बचाव पॅनलची निर्मिती करण्यात आली असून, १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर बॅँकेचे माजी अध्यक्ष माधवराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष पॅनलची निर्मिती करण्यात आली असून, त्यांचेही १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चार अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. श्री गणेश सहकारी बॅँकेसाठी चार हजार ८८८ मतदार असून, रविवारी नाशिक येथील अभिनव बालविकास मंदिर तसेच पिंपळगाव येथील क. का. वाघ महाविद्यालयात मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल. १२ संचालक पदांच्या जागांसाठी एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, सर्वसाधारण गटातून १४, इतर मागास प्रवर्गातून दोन, महिला राखीव गटातून चार, भटक्या विमुक्त जाती गटातून २ तसेच अनुसूचित जाती जमाती गटातून २ तसेच अन्य चार असे एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. सोमवारी (दि.२२) सकाळी ८ वाजेपासून द्वारका येथील समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
गणेश बॅँकेसाठी आज मतदान, उद्या मतमोजणी १२ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात
By admin | Published: June 21, 2015 1:13 AM