लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एसटी कामगारांचा वेतनवाढ करार संपुष्टात येऊन वर्षाचा कालावधी उलटला असून, अद्यापही व्यवस्थापनाकडून मान्यताप्राप्त संघटनांना करारासाठी पाचारण केले जात नसल्याने सरकारला हिसका दाखविण्यासाठी एसटी कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची अनुकूलता तपासून पाहण्यासाठी येत्या २६ व २७ मे रोजी राज्यभर मतदान घेण्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ठरविले आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेशी वेतनवाढ करार करावा यासाठी १ जानेवारी २०१६ रोजीच मागण्यांचा मसुदा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे; मात्र वर्ष उलटूनही वेतन सुधार समितीची बैठक घेण्यात आलेली नाही. या समितीस वारंवार मुदतवाढ देऊन कामगार करारास जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा आरोपही मान्यता प्राप्त संघटनेने केला आहे. एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा असा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला असून, त्यास व्यवस्थापन नकार देत असल्याने एसटी कामगारांना संपावर जाण्याशिवाय पर्यायच राहिला नसल्याची बाब ११ मे रोजी झालेल्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत चर्चिली गेली व त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कामगारांचा कौल जाणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या २६ व २७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बस डेपोंमध्ये संघटनेच्या वतीने मतदान प्रकिया राबविली जाणार आहे. त्यानंतर संपावर जाण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, एसटी कामगारांना राज्य शासनात विलीन करावे, आयोग लागू होईपर्यंत २५ टक्के अंतरिम वाढ द्यावी अशी मागणीही एसटी कामगार संघटनेने केली आहे.
एसटी संपाचा कौल घेण्यासाठी घेणार मतदान
By admin | Published: May 18, 2017 1:16 AM