नाशिक : वंचित घटकांच्या व्होटबॅँकेवर राजकारण करणाºया प्रस्थापित राजकीय पक्षांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने चांगलीच चपराक दिली. वंचित आघाडीकडे वळालेल्या दलित मतांमुळे यापुढील राजकारणाची दिशादेखील बदलली जाणार असल्याने संकेत मिळाले असून, भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरा पर्याय उभा करण्यासाठी घेतलेली राजकीय भूमिका फलद्रुप होताना दिसत आहे. या निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी तब्बल एक लाख दहा हजारांपेक्षा अधिक मते घेतल्याने वंचित आघाडीने आपले अस्तित्व सिद्धही केले.अवघ्या सहा महिन्यांचा हा पक्ष मात्र सर्वच्या सर्व जागा लढविण्याचे धाडस त्यांनी दाखविल्याने मतदारांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे उभे राहण्याची ठाम भूमिका घेतली हे मतदानातून दिसून आले. पवन पवार यांना लाखाच्या पुढे तर दिंडोरीतून बर्डे यांना ५० हजारांपेक्षा अधिक मिळालेल्या मतदानामुळे वंचित आघाडीने केवळ आपले अस्तित्व दाखवून दिले असे नाही, तर दलित, मुस्लीम मतांना गृहित धरणाºया पक्षांना चांगलीच चपराकही दिली.या निवडणुकीत एकत्र आलेली दलित, मुस्लीम मते आगामी काळात राज्याच्या राजकारणात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अत्यंत कमी वेळेत वंचित आघाडीला नाशिकमध्ये झालेले मतदान पाहता वंचित आघाडीचा आगामी काळात मोठी ताकद उभी करेल असे आशावादी चित्र नक्कीच आहे. प्रकाश आंबेडकर दलित, वंचितांची मते आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झाल्याने राजकारणात वंचित आघाडीचे महत्त्व वाढलेच शिवाय याच मतदारांच्या बळावर नाशिकमध्ये आता नवी ताकद उदयास येऊ शकते ही धास्ती इतर पक्षांना नक्कीच बसणार आहे.मतदारांनी दिली पसंती : मोठे आणि प्रस्थापित राजकीय पक्षांचे दिग्गज उमेदवार रिंगणात असतांनाही अवघ्या सहा महिन्यात उभ्या राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही मोठे मतदान झाल्याने या मतांचा टक्का दुर्लक्ष करून चालणारा नाही. शहरातील दलित, बहुजन तसेच मुस्लीम बहुल भागातून वंचित आघाडीला मतदान झालेच शिवाय देवळाली, इगतपुरी, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यमधूनदेखील मतदान झाल्याने दलित मते एकवटल्याचे अधोरेखित झाले. कोणतीही मोठी पूर्वतयारी आणि आर्थिक पाठबळ नसतांनाही ज्या ताकदीने दलित मते एकवटली ती मते आगामी काळात मोठी निर्णायक भूमिका बजावतील हे लाखांच्या मतांनी दाखवून दिल्याने राजकारणात वंचित आघाडीचे महत्त्व वाढले आहे.लाखोंचे मतदान : वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना एक लाखांपेक्षा अधिक मिळालेल्या मतदानामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या निवडणुकीची आठवण अनेकांना झाली. गायकवाड यांना १९५७ आणि १९६२ मध्ये नाशिकमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर आता पवार यांना ते मिळाले आहे.
वंचित आघाडीकडे वळलेले मतदान; तिसऱ्या पर्यायाचा भक्कम पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:43 AM