नाशिक : लोकसभा निवडणूक संपत नाही तोच महापालिकेच्या सातपूर विभागातील दहा ड या एका जागेसाठी २३ जूनला निवडणूक होणार असून, त्यानंतर चोवीस तारखेला फैसला होणार आहे.सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा ड जागेवरील नगरसेवक सुदाम नागरे यांचे गेल्या वर्षी जुलै महिन्यात निधन झाले. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ एकने घटून ६५ वर आले होते. गेल्या वर्षभरापासून या एका जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. आता निवडणूक जाहीर केली आहे. त्यासाठी १० एप्रिल २०१९ रोजी अस्त्विात असलेल्या विधानसभेची मतदार यादी असून, ती प्रारूप यादी हरकती आणि सूचनांसाठी जाहीर केली आहे. नव्याने या मतदार यादीत मतदारांची वाढ झाली आहे. आता या प्रभागाची मतदार संख्या २८ हजार ५६ हजारपर्यंत पोहोचली आहे. येत्या सोमवारी (दि. २७) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर आता येत्या ३० मेपासून ६ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवधी आहे. ७ जून रोजी दाखल अर्जांची छाननी करण्यात येईल. १० जूनपर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर २३ जून रोजी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, तर २४ तारखेला मतमोजणी होईल.बिनविरोध निवडीसाठी हालचालीमहापालिकेत सेना-भाजपाची युती झाल्याने आता ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नागरे यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत असून, सहानुभूतीच्या आधारे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
प्रभाग दहाच्या पोटनिवडणुकीसाठी २३ जूनला होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:41 PM