एकलहरे : परिसरात मृग नक्षत्राचा दमदार पाऊस झाल्यामुळे सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरेगाव, गंगावाडी येथे शेतीच्या कामांना वेग आला आहे. ठिकठिकाणी टोमॅटो लागवडीसाठी लगबग सुरू आहे. काही ठिकाणी डाळिंबबागांना चांगला बहर आलेला आहे. सुमारे साडेतीन महिन्यांचा फळबहार डाळिंबाच्या झाडांवर लगडलेला दिसतो.डाळिंबाच्या झाडाच्या बुडालगत फुटलेला अनावश्यक फुटवा खुडण्याचे काम या बागांमधून सुरू झाले असून, हा अनावश्यक फुटवा खुडल्याने डाळिंबाची फळे जोमाने वाढतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला फुटवा खुडण्याचे काम शेतकऱ्यांनी वेगाने सुरू केले आहे. सध्या भगव्या जातीचे वाण या भागात लागवड केलेले आहे. मार्च महिन्यात फळबहार धरलेल्या बागा आता बºयापैकी डाळिंबाने लगडलेल्या आहेत. साडेतीन महिन्यांच्या कालावधीत एकेका झाडाला पन्नास ते साठ फळे मध्यम आकाराची लगडलेली दिसतात. अजून दोन महिन्यांनंतर हे डाळिंब बाजारामध्ये येतील, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
एकलहरे परिसरात डाळिंबबागा फुलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:24 AM