नाशिक : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या विद्यमाने दि. २२ ते २५ मार्च या कालावधीत तेलंगणा राज्यातील सूर्यपेठ येथे होणाऱ्या ‘४७व्या कुमार व कुमारी’ गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ जाहीर झाले आहेत. कोल्हापूरच्या तेजस पाटीलकडे मुलांच्या संघाचे, तर पुण्याच्या समृद्धी कोळेकरकडे मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. मुलींच्या संघात नाशिकच्या पूजा कुमावतने स्थान पटकावले आहे.
मुलांच्या संघात मुंबई उपनगर व अहमदनगर जिल्ह्याच्या २-२ खेळाडूंनी स्थान मिळविले आहे, तर कोल्हापूर, जालना, रत्नागिरी, औरंगाबाद, सांगली, बीड, ठाणे, पुणे या जिल्ह्यांच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे. मुलींच्या संघात मुंबई उपनगर व पुणे या जिल्ह्याच्या २-२ खेळाडूंनी संघात स्थान मिळविले आहे. मुंबई शहर, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, नाशिक, रायगड, अहमदनगर, पालघर यांच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे. मुलींच्या संघ व्यवस्थापकपदी वंदना कोरडे यांचीदेखील निवड करण्यात आली आहे. या संघांचे सराव शिबिर नाशिक येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्टेडियम विभागीय क्रीडा संकुल हिरावडी रोड नाशिक येथे सुरू आहे. या शिबिराचे आयोजन नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने व क्रीडा उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन १३ मार्चला सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, कोषाध्यक्ष मंगल पांडे, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच सतीश सूर्यवंशी, दत्ता शिंपी, विलास पाटील, शरद पाटील, किरण गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
इन्फो
निवडक खेळाडूंची चाचणी
वाढत्या कोरोना संसर्गामुळे निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन न करता निवडक खेळाडूंना पाचारण करून त्यांची मैदानी निवड चाचणी घेण्यात आली. त्या निवड चाचणीतून हे दोन्ही संघ निवडण्यात आले. त्यासाठी दि. ८ व ९ मार्च रोजी कर्नाळा स्पोर्ट्स क्लब, पनवेल, जिल्हा रायगड येथे ही चाचणी घेण्यात आली.