भगूर : दारणा नदीवरील भगूर-पांढुर्ली-सिन्नर यांना जोडणाऱ्या पुलाचे खांब भराव वाहून गेल्याने धोकादायक स्थितीत उभे आहेत. त्यामुळे सदर पुलाचे तत्काळ तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.भगूर गावाला सध्या पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याने नगरसेवक कविता यादव यांनी नदीपात्राची पाहणी केली असता पुलाखालील भराव वाहून गेल्याने खांब उघडे पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. खांबाच्या आतील लोखंडी अँगल्स दिसत असल्याने सदर खांब अत्यंत धोकेदायक असल्याने लक्षात येते. यंदा नदीपात्र कोरडे ठाक पडल्याने सदर बाब उघडकीस आली आहे.सध्या हा पूल मागील व पुढील तीन पिलर खांबावर आधांतरित उभा आहे, तर मधल्या निखळत चाललेल्या खांबाकडे लक्ष न दिल्यास दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीला रोटेशनने पाणी सोडल्यास किंवा पावसाळ्यात पाण्याखाली पिलर गेल्यास तग धरून असलेला लोखंडी खांब केव्हाही कोसळू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. शासनाने भगूर दारणा नदीच्या पुलाची संपूर्ण पाहणी करून सहाही पिलरची डागडुजी करून मजबूत करावा, अशी मागणी नगरसेविका कविता यादव, आठवडे बाजार मित्रमंडळ यांच्यातर्फे करण्यात येत आहे. दारणा नदीवर अंदाजे ५० वर्षांपूर्वी दारणा नदीवर पूल बांधलेला आहे. या पुलावरून सिन्नर तालुक्यातील शेकडो गावाची नाशिकरोडकडे शेतीमाल, औद्योगिक माल वाहतूक दररोज सुरू असते. सिन्नर-इगतपुरी-नाशिक या तीन तालुक्यांच्या हा मुख्य वाहतूक पूल महत्त्वाचा झाला आहे. या पुलावरील अवजड वाहतूक असल्याने धोका अधिकच वाढला आहे. (वार्ताहर)भराव वाहून गेल्याने पुलाचे पिलर असे धोकादायक बनले आहेत.
पूल बनला धोकादायक
By admin | Published: April 22, 2017 12:45 AM