नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवरील दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजकातील शोभेच्या फुलांची रोपे वाळली असून, या ठिकाणी गवत वाढले आहे. तर गंजमाळ परिसरातील रस्त्याच्या दुभाजकावर कचरा फेकला जात असल्याने या दुभाजकाची कचराकुंडी झाली आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील दुभाजकावरही मोठ्या प्रमाणात बोगनवेल वाढल्याने या दुभाजकाचीही दुरवस्था झाली आहे.
---
लॉकडाऊनमध्येही दूधपुरवठा सुरळीत
नाशिक : शहरात लॉकडाऊनच्या काळात सर्वच बाजार व्यवस्था प्रभावित झालेली असताना शासन-प्रशासनाकडून दूध विक्रीला परवानगी असल्याने शहरातील दूधपुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. शहरातील नागरिकांना घरपोच दूध मिळत असून, दूध बाजारातही दुधाची नियमित आवक होत आहे. ग्राहक दोन ते तीन दिवस पुरेल इतके दूध एकदाच घेत असल्याने त्याचा मागणीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
---
शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी राज्य सरकारचे निर्बंध अजूनही लागू आहेत. मात्र, नागरिकांना त्यांचा विसर पडला असून, शहरातील रस्ते आणि जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्याचप्रमाणे भाजी बाजारातही नागरिकांकडून ७ ते ११ वाजेपर्यंतची वेळ पाळली जात नसून, अकरा वाजल्यानंतरही अनेक भाजी व फळविक्रेते रस्त्यांवर मालाची विक्री करताना दिसून येत आहेत.
--
शहरातील दुकाने बंद, टपऱ्या सुरू
नाशिक : इंदिरानगर भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व दुकाने सकाळी ११ वाजेनंतर बंद राहात असले तरी परिसरातील पानटपऱ्या मात्र सुरूच आहेत. अनेक टपऱ्यांवर अवैधरीत्या गुटखा अथवा सुगंधित तंबाखूची विक्री सुरूच आहे. काही पानटपरीधारक टपरीजवळ थांबून येणाऱ्या ग्राहकांना तंबाखू व अन्य अमली पदार्थांची विक्री करीत आहेत.
--
भाजीविक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन
नाशिक : इंदिरानगर भागात भाजीविक्रेत्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. रथचक्र परिसर व अश्वमेध परिसरात भाजीविक्रेत्यांकडून मास्क आणि सॅनिटायझरसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
--
कर्ज हप्ते स्थगित करण्याची मागणी
नाशिक : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केल्याने, अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहे. अशा व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना गृहकर्जासह विविध प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, राज्य सरकारने बँकांना सूचना करून कर्ज हप्ते स्थगित करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
---
लहान मुलांच्या मास्कला मागणी वाढली
नाशिक : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असून, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लहान मुलांच्या मास्कला मागणी वाढली आहे. लहान मुलांना आकर्षित करणारे कार्टून छाप मास्क विक्रेत्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
---
इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव
नाशिक : इंदिरानगर परिसरात विजेच्या लपंडाव सुरू आहे. अनियमित वीजपुरवठ्यामुळे घरूनच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थांच्या ऑनलाइन शिक्षणातही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
---
रविशंकर मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य
नाशिक : डीजीपीनगर परिसरातील श्रीश्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची सफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील नाल्याची महापालिकेच्या सफाई विभागाने नियमित सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
---
कोरोनासोबतच उन्हाळ्यामुळे संत्रे, लिंबांना मागणी
नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत मोसंबी, संत्री व लिंबांना मोठी मागणी आहे. मात्र, कोरोना व उन्हाळा, वाढती मागणी लक्षात घेता या फळांचे दर महिनाभरापासून गगनाला भिडले आहेत. या रसवर्गीय फळांसोबतच टरबूज, खरबूज, सफरचंद, किवी या फळांनाही नाशिककरांकडून पसंती मिळते आहे.
--