देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील जिल्हा परिषद षटकोनी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून परिसरात गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, एकाच शाळेच्या इमारतीत १ ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. कोविड प्रादुर्भावमूळे राज्यातील शाळा, महाविद्यालये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद आहेत. येत्या ३० सप्टेंबर रोजी शाळा,महाविद्यालये सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात शाळेमध्ये बसायला पुरेशी जागा नसेल तर विद्यार्र्थी येण्यास कचरतात. परिणामी, विद्यार्थी संख्येत घट निर्माण होऊन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. सद्यस्थितीत देवगाव येथील जि. प. शाळेची एकच ईमारत सुस्थितीत असून त्यामध्येच १ ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोंबून अध्ययन केले जाते. देवगाव येथील जिल्हा परिषद शाळेची षटकोनी इमारत सुस्थितीत नसून तीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. भविष्यात केव्हाही शाळा होतील तेव्हा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बसायचे कसे? हा प्रश्न ठाकला आहे. या शाळेचे त्वरित नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सन २००७-०८ ते २००८-०९ मध्ये जिल्हा परिषदने लाखो रुपये खर्चून दोन षटकोनी शाळा देवगाव येथे बांधल्या होत्या. आज बावीस वर्षांनंतर त्या शाळांची अवस्था नाजूक झाली असून स्लॅबमधून पाणी गळतंय, खिडक्यांची दुरवस्था झाली असून इमारत वापरण्यायोग्य नसून धोकादायक आहे. वारंवार पाठपुरावा करूनही या शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण होत नाही. विद्यार्थ्यांची परवड लक्षात घेऊन लवकरात लवकर शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
देवगाव शाळेच्या इमारतीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 2:04 PM