दिंडोरी तालुक्यातील काही रस्त्यांनी कात टाकली असून, दिंडोरी ते मोहाडी हा रस्ता आजही मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी व्यापला आहे. दहा किलोमीटर अंतराचा हा रस्ता तालुक्यात महत्त्वपूर्ण मानला जातो. परंतु या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. या रस्त्यावर साधारणपणे पाच पूल आहेत. या पुलांवरून प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. सदर रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा मानला जातो. ओझर, जानोरी, मोहाडी, कोऱ्हाटे तसेच इतर गावांना जाण्यासाठी जवळचा हा रस्ता सोयीचा आहे. परंतु या रस्त्याची दुरवस्था झाल्याने मोहाडी किंवा ओझर जाण्यासाठी अक्राळेमार्गे प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास मोठ्या प्रमाणावर खर्चिक बनला आहे. त्यामुळे या रस्त्याकडे संबंधित खात्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.दिंडोरी ते कोऱ्हाटे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यात काही ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. परंतु या रस्त्यावर भर उन्हाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाळ्यासारखे पाणी साचले आहे. तेव्हा हे पाणी येते कोठून ही समस्या प्रवाशीवर्गासाठी डोकेदुखी बनली आहे..
दिंडोरी-मोहाडी रस्त्याची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 5:52 PM