▪️सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींचीही डोळेझाक
लोकप्रतिनिधींचीही डोळेझाक : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर-घोटी-वाडा या मार्गावर देवगाव फाटा येथे असलेल्या दिशादर्शक त्रिफुलीची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुरवस्था झाली असून, त्रिफुलीचे दोन तुकडे होऊन पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले असून, दिशादर्शकाची कुठल्याही प्रकारचे नुतनीकरण व डागडुजी न केल्याने प्रवाशांसोबत नागरिक संतप्त झाले आहेत.
देवगाव फाट्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची त्रिफुली असून, त्रिफुलीवर सर्व मार्गावरील रस्त्यांच्या दिशादर्शकासह, किलोमीटरसह माहिती फलक व किलोमीटरचे आकडे होते. परंतु एक ते दीड वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दुर्दशा व पडझड झाल्याने त्रिफुलीवर सद्यस्थितीत प्रवासी व वाहनचालक यांना समजेल अशी काहीच माहिती शिल्लक नाही आणि आता त्याठिकाणी त्रिफुलीचे दोन तुकडे होऊन मोडलेल्या स्थितीत असल्याने नवीन प्रवासी व वाहनचालक यांना माहिती अभावी मोठी अडचण निर्माण होत असल्याने संबंधित बांधकाम विभागाने देवगाव फाट्यावर नवीन त्रिफुली बांधून प्रवासी व वाहनचालकांची परवड थांबवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
त्र्यंबकेश्वर-घोटी-वाडा या तिहेरी मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेले त्र्यंबकेश्वर, नाशिक, आंबोली घाट, वाघेरा घाट, हरिहर किल्ला, अपर वैतरणा धरण परिसर आदी. ठिकाणी विविध राज्यांतून पर्यटक तसेच भाविक येत असतात. परंतु, दिशादर्शक फलकाची झालेल्या दुरवस्थेमूळे वाहनांची दिशाभूल होते. तसेच कुठला मार्ग कुठे जातो? आणि अजून किती अंतरावर जायचं आहे हे समजत नाही. या मार्गावरील दूरवर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्गक्रमण असल्याने त्रिफुली मोडक्या अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांना काहीच सूचत नाही. देवगावफाट्याच्या नजीकच पालघर जिल्ह्याची सीमारेषा असल्याने येथून येणाऱ्या वाहनांची मार्गक्रमण करताना पंचाईत होते.
------------------
वाहनधारकांचे हाल
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या देवगाव येथील त्रिफुलीची दैना झाली असताना लोकप्रतिनिधींनी देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असून, कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. परिणामी दूरवरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना मिळेल त्या व्यक्तींकडून विचारपूस करून मार्गक्रमण करावे लागते. दिशादर्शक फलक असूनही त्याची डागडुजी केली जात नसल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधींचेदेखील या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांसह वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. (१३ देवगाव)
130721\13nsk_11_13072021_13.jpg
१३ देवगाव