तरणतलाव सिग्नलवरील डावे वळण बंद
टिळकवाडी : तरणतलाव सिग्नलवरील टिळकवाडीकडून त्र्यंबक रोडला येऊन मिळणा-या रस्त्यावरील डावीकडे जिल्हा रुग्णालयाकडे जाणारा वळण बंद असल्याने गैरसोय होत आहे. सिग्नल लाल झाल्यास वाहनांची रांग लागते. त्यामुळे येथील रस्त्याच्या कामाची तत्काळ दुरुस्ती करून डाव्या बाजूचे वळण सुरू करावे.
वडाळा रोडची दुर्दशा कायम
वडाळागाव : वडाळा चौफुलीपासून तर थेट पांढरी आईदेवी चौकापर्यंतच्या वडाळा गावातील मुख्य रस्त्याची दुर्दशा कायम आहे. या रस्त्याचे डांबरीकरण केले जात नसल्याने रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. चांदशावली बाबा दर्ग्यासमोर तर रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे.
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीमुळे अपघातांना निमंत्रण
खोडेनगर : डीजीपीनगर-संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावर भरदिवसा व रात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांच्या झुंडींचा मुक्तसंचार वाढल्याने अपघाताना निमंत्रण मिळू लागले आहे. भटकी कुत्री रस्त्यांवर वाहनांसमोर येत असल्याने वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत.
म्हसोबा चौकात हायमास्ट लावण्याची गरज
डीजीपीनगर : महापौरांच्या निवासस्थानाकडे वडाळामार्गे जाणाऱ्या सावतामाळी कॅनॉल रोडवर म्हसोबा महाराज चौकात असलेल्या वाहतूक बेटात हायमास्ट बसविण्याची मागणी होत आहे. कारण या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. येथील चौकात श्री.श्री. रविशंकर मार्गदेखील येऊन मिळतो. त्यामुळे या त्रिकोणात रात्री वाहने समोरासमोर येऊन अपघात घडतात.