मांडवड : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता उघडीप दिली असली तरी त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हैराण करून सोडल्याने या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. लक्ष्मीनगर ते नांदगाव हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. हा रस्ता पार करत असताना किमान तीन वेळा शाकंबरी नदी पार करावी लागते. यंदाच्या पावसाने नदीवरील पूल खराब झाले आहेत. त्यात महापुरुषाबाबाचा फरशी पूल हा शेवटच्या घटका मोजत असून, यावरून अवजड वाहन न्यावे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नांदगावजवळील हाग्या नाल्याचा फरशी पूल तर पुरामुळे वाहून गेला आहे. त्याशिवाय लक्ष्मीनगर ते मांडवडमधील घातडी मधील रस्ताच वाहून गेल्याने वाहनधारकांना नांदगावी पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. तेव्हा संबंधित विभागाने या रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लक्ष्मीनगर ते नांदगाव रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 9:27 PM