---------------------
सिन्नरला खाद्यपदार्थ व्यावसायिकांना फटका
सिन्नर : तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळे अनेक ग्राहक अद्याप बाहेर खाण्याचे टाळत असल्यामुळे शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यातच महागाईमुळे या विक्रेत्यांना विविध खाद्यपदार्थांचे दर वाढवावे लागले आहेत. त्याचाही व्यवसायाला फटका बसला आहे.
-------------------------
लसीकरणासाठी ज्येष्ठांना आधारकार्ड गरजेचे
चांदवड : तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना लसी दिली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, वडाळीभोई, वडनेरभैरव, उसवाड, काजीसांगवी, तळेगावरोही येथेही लसीकरणास प्रारंभ झाला आहे. लसीकरणासाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, पेन्शन कागदपत्र आदींपैकी एक कागदपत्र आणावे, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे.
-----------------------
विजेअभावी पिके वाळण्याची भीती
कळवण : महावितरण कंपनीकडून मागील काही दिवसांपासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नाही. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तालुक्यातील कृषिपंपाची विजेची मागणी वाढली असल्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. पाण्याअभावी पिके वाळण्याची भीती आहे.
---------------------
निफाड परिसरात उष्म्याने नागरिक हैराण
निफाड : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात ग्रामस्थांना उष्म्याने भाजून काढले आहे. सकाळपासून वातावरणात उष्मा जाणवत आहे. त्यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट असतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे परिसरात चांगलाच गारवा निर्माण झाला होता.