सिन्नर, संगमनेर, अकोला, कोपरगाव व येवला या पाच तालुक्यांना जोडणारा नांदूरशिंगोटे ते वावी हा महत्त्वाचा रस्ता आहे, तसेच शिर्डी येथे जाण्यासाठी भाविक याच पर्यायी मार्गाचा वापर करतात. दोन वर्षांपूर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा रस्ता असल्याने अवजड वाहनांची वर्दळही अलीकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जाम नदीवर असलेल्या नांदूरशिंगोटे ते वावी, तसेच कणकोरी फाटा ते निऱ्हाळे गावापर्यंत अनेक ठिकाणी नदीवरून फरशी पूल टाकण्यात आले आहेत; परंतु रस्त्यांचे डांबरीकरण करण्याआधी त्यांची उंची वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची संख्या वाढल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नदीपात्र व रस्ता एकाच स्थितीत असल्याने पावसाळ्यात पुलावरून ३ ते ४ फूट पाणी वाहते. पूर्व भागातील मऱ्हळ, निऱ्हाळे-फत्तेपूर, कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे आदी गावांतून जाम नदी वाहत असून, यावर अनेक ठिकाणी फरशी पूल आहेत. नदीवरील पावसाचे पाणी वाहत असल्याने पाण्यात वाळू वाहत येऊन फरशी खालील सिमेंट पाइप वाळूने बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी फरशीवरून वाहत आहे.
परिसरातील लोकप्रतिनिधींनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकांना परशी पुलाबाबत पत्रव्यवहार केला आहे, तसेच गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जाम नदी दुथडी भरून वाहत होती. त्यावेळी निऱ्हाळे येथील एका युवकाला नदीवरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह तो वाहून गेला होता.
कोट...
नांदूरशिंगोटे ते वावी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, जाम नदीवर असणाऱ्या फरशी पुलांची मात्र मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, तसेच अवजड वाहतूक वाढल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात परिसरातील नागरिकांची मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे परिसरातील पुलांची दुरुस्ती करून उंची वाढविण्याची गरज आहे.
- योगिता सांगळे, सरपंच, कणकोरी
फोटो - ०९ नांदूरशिंगोटे १
कणकोरी येथील जाम नदीवर कमी उंचीचा असलेला फरशी पूल.
090721\09nsk_5_09072021_13.jpg
कणकोरी येथील जामनदीवर कमी उंचीचा असलेला फरशी पुल.