गेल्या काही वर्षांपासून टाकळीगाव ते पोद्दारशाळा रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. जेलरोड परिसरातील नोकरदार, विद्यार्थी, गृहिणी जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नगरसेवक राहुल दिवे यांना नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीगाव ते पोद्दारशाळा मार्गावर सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी रस्ता खचल्याने तत्पुरती डागडुजी करण्यात आली होती. रस्त्याला मधोमध तडे गेल्याने या ठिकाणी डांबर ओतून मलमपट्टी करण्यात आली. आता पुन्हा रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले असून, सिमेंट उखडल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात वाहनचालक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात. खड्डयांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर येत आहेत. त्यातच अनेक पथदीप बंद असल्याने रात्री नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे पथदीप तत्काळ सुरू करण्यासह रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते हिरामण लोखंडे, दौलत शिंदे, राजू धनगर, अंबादास लोखंडे, भारत लोखंडे, अरूण लोखंडे, आकाश लोखंडे आदींच्या सह्या आहेत.