---------------------
नांदूरशिंगोटेत जनता कर्फ्यू
नांदूरशिंगोटे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारपासून गावात जनता कर्फ्यू लागू केलेला आहे. आठ दिवसांच्या कालावधीत दवाखाना व मेडिकल सुरू राहणार आहेत. अन्य अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यासाठी मदत होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
-----------------
रमजानवर कोरोनाचे सावट
नांदूरशिंगोटे : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने यंदाही साधेपणाने रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. ईदनिमित्त बाजारपेठेत असणारा खरेदीचा उत्साह व यातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल यंदाही ठप्प आहे. रमजान महिन्यात टरबूज, खरबूज व इतर फळांना मोठी मागणी असते. यंदा कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनमुळे या वस्तूंच्या खरेदी - विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे.
--------------------
गरिबांचा फ्रीज कोरोनामुळे संकटात
नांदूरशिंगोटे : गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा मातीपासून बनवलेला पाण्याचा माठ सध्या कोरोनामुळं संकटात सापडला आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ या गावातील कुंभार समाजबांधवांनी मातीपासून बनवलेले पाण्याचे माठ, टीप, रांजणी तालुक्यात व तालुक्याबाहेर प्रसिद्ध आहेत.
------------------
मानोरी, नळवाडीत कोरोना लसीकरण
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या मानोरी, नळवाडी व कासारवाडी येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तिन्ही ठिकाणी २५० नागरिकांना लस देण्यात आली. नांदूरशिंगोटे उपकेंद्रांतर्गत मानोरी तर चास उपकेंद्रांतर्गत नळवाडी व कासारवाडी येथे लसीकरणाचे आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले होते.