उपनगरला कमी दाबाने पाणीपुरवठा
नाशिक : उपनगर परिसरातील प्रगती कॉलनी, रामदासस्वामी नगर आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पाण्याचा दाब कमी असल्यामुळे सकाळी घाईच्यावेळी महिलांची कामे होत नाहीत. यामुळे त्यांना पाण्यासाठी ताटकळावे लागते. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
जिल्हा परिषद मार्गावरील खड्डे बुजवावेत
नाशिक : जिल्हा परिषद रस्त्यावर खोदलेले खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे. या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. रस्त्याच्या एका बाजूला खोदलेले खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून जैसे थे आहेत. यामुळे राेज सकाळी या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. याबाबात त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
नांदूरनाका रस्त्यावर खड्ड्यांमुळे नाराजी
नाशिक : जेलरोड ते नांदूरनाका रस्त्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये वाहन आदळून वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच वाहनचालकांनाही पाठीच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे.
गंजमाळ परिसरात स्वच्छतेची मागणी
नाशिक : शहरातील गंजमाळ परिसरात रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर कचरा साचला आहे. मोकाट जनावरे दिवसभर येथे फिरत असतात यामुळे कचरा इतरत्र पांगतो. याभागात स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी वाढली
नाशिक : शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. अनेक नागरिक तोंडाला मास्क न लावताच सर्वत्र वावरत असतात. काही कार्यालयांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण
नाशिक : सरपंच, उपसरपंच निवडणुकीनंतर नाशिक तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन झाले असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये तरुणांना संधी मिळाल्याने गावातील तरुणांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी काहीतरी भरीव काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात मजुरीचे दर वाढले
नाशिक : डिझेलचे दर वाढल्याने ग्रामीण भागात ट्रॅक्टरचालकांनी शेतीच्या विविध कामांचे दर वाढविले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. गतवर्षीच्या तुलनेत शेतीच्या मशागतीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. याबरोबरच मजुरांनीही मजुरीचे दर वाढविल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.