नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर व जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकात तीनशेच्या आसपास बसची नोंद होते. तसेच दररोज शेकडो प्रवाशांची चढ-उतार येथे होत असते. पंचवीस गावांचा केंद्रबिंदू व मध्यवर्ती ठिकाण असल्याने परिसरातील प्रवाशी येथील बसस्थानकाला पसंती देतात. परंतु येथील बसस्थानकाची गेल्या काही वर्षापासून दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ व प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तीन ते चार वर्षापूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनतंर बसस्थानकाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली होती. बसस्थानक परिसरात खड्डेच-खड्डे व घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात दुर्गंधी पसरते. सिन्नर, संगमनेर, नाशिक, लोणी, दोडी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी परिसरातील गावांतील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थींनी येथील बसस्थानकात दररोज येत असतात. पावसाळ्यात आवारातील या खड्यांमध्ये पाणी साचल्याने प्रवाश्यांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या पाण्यातूनच वाट शोधावी लागते. तसेच बसस्थानकात प्रवेश करताना अनेक बसचालकांना खड्डा वाचवितांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बसस्थानकातील काही भागातील डांबरीकरण उखडले असल्याने अनेक ठिकाणी खड्डे पहावयास मिळत आहे. तसेच काही भागात पत्र्यांना गळती असल्याने प्रवाशांना बसस्थानकात ताटकळत उभे रहावे लागते. परिवहन विभागाने याबाबत लक्ष घालून बसस्थानकातील खड्ड्यांची दुरूस्ती करण्याची मागणी प्रवाशांसह ग्रामस्थांनी केली आहे.
नांदूरशिंगोटे बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 6:09 PM