मुंजवाड : येथील मेळवण शिवारात शेतात बारे देत असलेल्या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. त्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. मुंजवाड येथील शेतकरी प्रवीण गोसावी यांच्याकडे सालदार असलेले हिरामण खंडू बच्छाव (५०) हे मक्याच्या शेताला पाणी देत असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळलेल्या हिरामण यांची बिबट्याशी झटापट झाली. त्यांनी आरडाओरड केली मात्र पत्नी व मुले शनिवारच्या बाजारासाठी सटाणा येथे गेल्याने कुणीही मदतीसाठी आले नाही. या झटापटीत हिरामण बच्छाव याच्या उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांचे पुढचे पेर आणि डाव्या हाताच्या मधल्या बोटाचा एक पेर तुटला आहे. या घटनेची माहिती देण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील यांना फोन केला असता त्यांनी फोन न उचलता कामात असल्याचा मेसेज पाठवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय अधिकाºयांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार सूचना देऊनही अधिकारी मात्र कामात असल्याचा आव आणून सर्वसामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 12:33 AM