नायगाव - सिन्नर व निफाड या दोन तालुक्याच्या गावांना जोडणाऱ्या नायगाव - पिंपळगाव ( निपाणी ) रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सुरू असलेले काम थांबविण्याची मागणी होत आहे.नायगाव उपबाजार समिती ते पिंपळगाव निपाणी शिवार या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत आहे. मात्र सदर रस्त्याच्या कामात संबंधित ठेकेदार सर्रास मुरूम वापरत असल्याची तक्रार सुनील कातकाडे व विजय भगत आदीसह शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.दोन तालुक्यांच्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे.
पिंपळगाव, तळवाडे, महांजनपूर, भेंडाळी आदी गावांतील शेतकऱ्यांना नाशिक बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी जवळचा रस्ता आहे. तसेच वरील गावांचा नायगाव येथे दैनंदिन कामासाठी दररोज ये-जा करावी लागत असते. त्यामुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अशा रस्त्याच्या कामाला सध्या सुरुवात झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
मात्र रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पध्दतीने होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित विभागाने सदर कामाची चौकशी करून निकृष्ट काम थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.