लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सालाबादप्रमाणे ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन सर्वत्र साजरा होणार आहे. मात्र, दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा म्हणजेच २०२१ च्या जून महिन्यापर्यंत होणे नियोजित होते. मात्र, गत तीन महिन्यांच्या काळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात दिलेल्या प्रचंड तडाख्यामुळे जनगणनेचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आपल्या शहराची, जिल्ह्याची, राज्याची आणि देशाची निश्चित लोकसंख्येचा आकडा समजण्यास यावेळी विलंबच होणार आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी जनगणनेचे काम दोन टप्प्यात होणार होते. त्यातील पहिला टप्प्यात घरांची यादी व घराची गणना करण्याचे काम गतवर्षी मे महिना ते जून महिन्यादरम्यान होणार होते. मात्र, गतवर्षीदेखील त्याच काळात कोरोनाची पहिली लाट जोरात असल्याने घरांची यादी आणि घरगणनाच झाली नव्हती. त्यानंतर दुसरा टप्पा हा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना हा यंदाच्या वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत होणार होता. मात्र, पहिल्या टप्प्यातीलच काम झालेले नसल्याने तसेच या काळात सर्वत्र दुसऱ्या लाटेने उचल खाल्ल्यामुळे कोणत्याच टप्प्याचे काम सुरूदेखील होऊ शकलेले नाही. या घरगणना आणि जनगणनेसाठी प्रगणक नेमण्यापासून पर्यवेक्षक नियुक्तीपर्यंत सर्व बाबींची पूर्तता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्याचे निर्देशदेखील शासनाकडून देण्यात आले होते. या गणने साठी नेमलेल्या प्रगणकांवर केंद्र शासनाने तयार केलेल्या विहित नमुन्यात महिती संकलनासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन ती माहिती भरून घेण्याची जबाबदारी निर्धारित करण्यात येणार होती. मात्र, त्यातील कुठल्याच प्रक्रियेची पूर्तता नाशिक शहर, जिल्हा किंवा राज्यात वा देशातही होऊ शकलेली नाही.
इन्फो
२०१९ च्या मार्चमध्ये निघाली होती अधिसूचना
केंद्र शासनाच्या वतीने दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेसाठी २०१९ च्या मार्च महिन्यातच अधिसूचना काढण्यात आली होती. दोन वर्षांआधी अधिसूचना काढून तसेच २०२० पासून त्याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देश देऊनदेखील प्रत्यक्षात कोरोनाचा प्रभाव सलग दीड वर्षाचा काळ कायम राहि्ल्याने त्या अधिसूचनेनुसार यंत्रणा कामकाज करू शकलेली नाही.
इन्फो
देशात १८७२ साली पहिली जनगणना
भारतात पहिली जनगणना ब्रिटिश काळात १८७२ मध्ये पार पडली . त्यानंतर १८८१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येऊ लागली. हे काम प्रचंड खर्चिक आणि समस्त यंत्रणेला कामाला लावणारे असल्याने बहुतांश देशांमध्ये दर दहा वर्षांनी जनगणना करण्याची प्रथा आहे. त्यामुळे २०११ नंतरची यंदाची जनगणना होण्यास बहुदा कोरोना समाप्तीनंतर पुढील वर्षापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.