नाशिक : कोरोना विषाणूसारख्या राष्ट्रीय आपत्तीत प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे खासगी डॉक्टर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सरसावले आहेत. शहरातील ३५ बालरोगतज्ज्ञ व १५ हृदयरोगतज्ज्ञ असे एकूण ५० डॉक्टरांचे जूनअखेरपर्यंत सेवा देण्याचे नियोजन व वेळापत्रक तयार केल्याची माहिती मालेगावच्या आयएमएचे अध्यक्ष डॉ. मयूर शाह यांनी दिली आहे.
एकीकडे कोरोनाबाधित रु ग्णांच्या आरोग्यसेवेसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असताना प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला आरोग्य प्रशासनावर गैरसमजातून हल्ले होत आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. यासाठी वैद्यकीय साक्षरता ही आज काळाची गरज असून, नागरिकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे मालेगावचे इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.
डॉक्टरांवरील वाढते हल्ले पाहता रु ग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाइकांमध्ये वैद्यकीय सेवेबद्दल मूलभूत साक्षरता निर्माण व्हायला हवी. डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असला, तरी बदलती परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. यासोबत रु ग्णांच्या नातेवाइकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य करायला हवे, असेही डॉ. आशिया यांनी नमूद केले.