नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासनाने केलेल्या संचार बंदीच्या आवाहनाला महानगर आणि परिसरात अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सकाळी बहुतांश परिसर निर्मनुष्य होते. मात्र, जुने नाशिक आणि गावठाण परिसरात सकाळच्या दूध खरेदीसाठीची गर्दी दूध बाजार परिसरात कायम असल्याने या भागातील प्रतिसाद हा संमिश्र स्वरूपाचा दिसून आला. महानगर आणि परिसरात रविवारच्या जनता संचारबंदी सकाळी आठ वाजेपर्यंत नागरीकांचा संमिश्र प्रतिसाद होता. गोदाकाठ, फुलबाजार, मेन रोड, जॉगिंग ट्रॅक, सीबीएस चौक, अशोक स्तंभ, गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर निर्मनुष्य असले, तरी दूध बाजार नेहमीच्याच गर्दीत सुरू होता. नागरीकांनी दररोजपेक्षा काहीशी कमी पण दूध खरेदी करण्यास गर्दी केली होती. दूध बाजारात जाऊन किंवा नेहमीच्या दूध विक्रेत्याकडे जाऊन दूध आणणे ही नाशिककरांची खासियत असलेली सकाळची दूध खरेदी सुरू होती. मात्र, शहरातील शालिमार, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, अशोक स्तंभ, मेहेर चौक, सीबीएस चौक, द्वारका आदि प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये अत्यंत किरकोळ स्वरूपात वाहनांची वर्दळ होती. दूध खरेदीची गर्दी देखील सकाळी आठपर्यंत अधिक होती. त्यानंतरच्या वेळेत खरेदीची गर्दी ओसरू लागली. त्यामुळे केलेले जनता संचारबंदीचे केलेले आवाहन काही प्रमाणात यशस्वी होत असल्याचे चित्र सकाळच्या वेळेत दिसून आले. नाशिकमध्ये पहाटेपासूनच फुलणारा फुलबाजार रविवारी मात्र फुलला नाही. त्यामुळे या बाजारात दिसणारी नेहमीची गर्दी आणि वर्दळ अजिबातच नव्हती. फुल विक्रेत्यांनी जनता संचारबंदी ला पुरेपुर प्रतिसाद दिल्याचे चित्र काळी दिसून येत होते. तसेच दशक्रियेसाठी देखील पाच सात कुटुंबे मोजक्याच नातेवाईकांसह आलेले होते .
नाशिक महानगरात सकारात्मक प्रतिसाद; जनता घरात रस्त्यावर शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 10:35 AM