सोमवारी (दि.१८) देशमुख नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्याच्या पोलीस दलाच्या गणवेशाबाबत विविध चर्चा होत असली तरीदेखील याबाबत अद्याप कोणताही निर्णय मंत्रालयस्तरावर घेण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक व वरिष्ठ अधिकारीवर्गाला भोजनासाठी निमंत्रित केले असता चर्चेतून पोलिसांच्या ड्रेसकोडबाबतचा मुद्दा पुढे आला. राज्याच्या एका वरिष्ठ पदावरील पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चेत राज्याच्या पोलिसांचा गणवेश बदलाबाबतचा विषय मांडला होता. यावर नक्कीच चर्चा सुरु असून सकारात्मक विचार केला जाईल, असे देशमुख म्हणाले. सुमारे दोन वर्षांपूर्वीच पोलीस शिपायांची टोपी बदलण्यात आली. लांबलचक टोपीऐवजी पोलीस शिपायांना निळ्या रंगाची ‘कॅप’ देण्यात आली आहे. यामुळे आता गणवेशाबाबत नेमका काय निर्णय राज्याच्या गृहखात्याकडून घेतला जातो, याकडे राज्याच्या पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.
पोलिसांच्या ‘खाकी’बाबत सकारात्मक विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:17 AM