कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्यानंतर चाचण्यांची संख्यादेखील प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. त्यात आरटीपीसीआर चाचण्या करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. फेब्रुवारी महिन्यात सुमारे १५ टक्क्यांपर्यंत असलेला पॉझिटिव्हिटी रेट मार्च महिन्याच्या प्रारंभापासून मोठ्या वेगाने वाढू लागला आहे. मार्च आणि एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे कमी असले तरी गतवर्षातील सर्वोच्च पॉझिटिव्हिटीपेक्षा हे ५ टक्क्यांनी अधिक आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारण २० ते २२ टक्क्यांवर असलेल्या या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये मार्चअखेरीस आणि एप्रिलच्या प्रारंभापर्यंत दुपटीने वाढ होऊन हे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचले होते. त्यात एप्रिलच्या मध्यावर काहीशी घट होण्यास प्रारंभ झाला असला तरी ते प्रमाण एप्रिलअखेरपर्यंत २८ टक्क्यांच्या आसपासच राहात होते. मे महिन्याच्या प्रारंभी अद्यापही धोकादायक पातळीवर कायम आहे. सध्याचा एकूण बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट २०.०६ टक्के असून, हा पॉझिटिव्हिटी रेट काहीसा कमी असला तरी तो गतवर्षीच्या सर्वोच्चपेक्षा अधिक पातळीवर कायम आहे.
इन्फो
गतवर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १५ टक्के
गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा उच्चांक सप्टेंबर महिन्यात झाला होता. त्या सप्टेंबर महिन्यात आणि गतवर्षात बाधितसंख्येने एकदाच २ हजारांचा आकडा ओलांडला होता. तेव्हादेखील कोरोना अहवाल बाधित येण्याचे प्रमाण अवघे १५ टक्क्यांवर होते. त्या तुलनेत सध्याचे बाधित प्रमाण वाढले असल्याने त्यातील तीव्रता अद्यापही आहे. गतवर्षी सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याचा होता. त्या वेळी ते प्रमाण ३७ टक्क्यांवर पोहोचले होते. मात्र, नाशिकमध्ये तर मार्चच्या महिन्यातच हे प्रमाण ३० टक्क्यांवर पोहोचले होते. अद्यापही हे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याने ते प्रमाण लवकरात लवकर कमी करण्यावर जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग झटत आहे.
इन्फो
मृत्युसंख्येतील वाढ चिंताजनक
कोरोना रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी दरातील वाढीबरोबरच मृत्युसंख्येतील वाढही अधिक मोठ्या चिंतेचे कारण ठरू लागली आहे. कोरोना बळींची संख्या सलगपणे वाढणे ही प्रशासनासह नागरिकांच्या दृष्टीने अधिक गंभीर बाब ठरत आहे. गतवर्षी कोरोनाच्या बहराच्या काळात सप्टेंबरमध्येच कोरोनाबळी दहा ते वीसवर राहण्याचे प्रमाण होते. मात्र, आता जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभापासून सातत्याने ३० ते ४० हून अधिक राहात आहे. बळींची ही सातत्यपूर्ण वाटचाल नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे.
ग्राफ
१ एप्रिल ४१.५४ टक्के
८ एप्रिल ४१.५२ टक्के
१५ एप्रिल ३१.८६ टक्के
२१ एप्रिल ३०.७१ टक्के
२८ एप्रिल २९.१० टक्के
१ मे २४.६० टक्के
२ मे २२.२१ टक्के
३ मे २०.०६ टक्के