नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारनजीक पोहोचली असल्याने एकूणच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ४५.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी (दि. १५) एकूण १९८९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, १४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांमध्ये सर्वाधिक १४९१ रुग्ण नाशिक मनपाचे, नाशिक ग्रामीणचे ३६७, तर मालेगाव मनपा ५१ आणि जिल्हाबाह्य ८० रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडण्याचे प्रमाण दोन हजारानजीक कायम राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊन ही संख्या ९२९८ पर्यंत पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक ७५३५ बाधित नाशिक मनपा क्षेत्रातील, १२१२ नाशिक ग्रामीण, मालेगाव मनपा १८२, तर जिल्हाबाह्य ३६९ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना मुक्ततेचे प्रमाण ९५.७९ टक्क्यांवर पोहाेचले आहे. जिल्ह्यातील पाॅझिटिव्हिटी रेट ४५.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात नाशिक मनपा ४६.२८ टक्के, नाशिक ग्रामीण ४२.६७ टक्के, मालेगाव मनपात २६.८४ टक्के, तर जिल्हाबाह्य ५४.४२ इतके आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण २५३१ असून, त्यात सर्वाधिक १४७७ अहवाल नाशिक ग्रामीणचे प्रलंबित आहेत, तर नाशिक मनपा ८७३ आणि मालेगाव मनपा १६३ अहवाल प्रलंबित आहेत.