आरोग्य विभागाच्या रविवारच्या अहवालानुसार नाशिक महापालिका हद्दीत १६.६७ इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. महापालिकेने एकूण ८,५७० संशयित रुग्णांची चाचणी केली असता त्यापैकी १,४२९ रुग्ण बाधित झाले. तर हेच प्रमाण ग्रामीण जिल्ह्यात अधिक असल्याचे आढळून आले आहे. एकूण ४,८३१ रुग्णांच्या चाचणीत १,२९८ रुग्ण बाधित आढळून आल्याने २६.८७ पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील १०१ रुग्णांची तपासणी केली असता, ५१ जण कोरोनाबाधित आढळून आल्याने त्याचे प्रमाण ५० टक्के इतके आहे.
चौकट===
ना तपासणी, ना रुग्ण
एकेकाळी काेरोनाचा हॉटस्पॉट ठरून कोरोना रुग्णांच्या मृत्यूत आघाडीवर असलेल्या मालेगाव शहरात गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी, त्यामागचे स्थानिक कारणे वेगळी आहेत. मात्र यालाच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ‘मालेगाव पॅटर्न’ म्हणून आपली स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. त्याच मालेगावमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची चाचणीच केली जात नसल्याने ना तपासणी, ना रुग्ण अशी परिस्थिती आहे. दहा ते बारा लाखांच्या लोकसंख्येच्या शहरात एका दिवसातून फक्त ७६ जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले असता त्यातील १७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मालेगावचा पॉझिटिव्हिटी रेट २२.३७ इतका म्हणजेच नाशिक शहरापेक्षाही अधिक आहे.