गांधीनगर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
गांधीनगर : गांधीनगर येथील अंतर्गत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. सदर वसाहत ही गांधीनगर प्रेसची मालमत्ता असल्याने प्रेस प्रशासनाच्या अंतर्गत ही बाब आहे. मात्र या मार्गाचा वापर कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी देखील करीत असल्याने या मार्गाची दुरस्ती करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रेजिमेंटल समोरील मार्गावर वाहतूक कोंडी
बिटको : नाशिकरोडममधील मध्यवर्ती ठिकाण असलेले रेजिमेंटल चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी रस्त्यापर्यंत वाहने पार्किंग केले जात असल्याने अन्य वाहनधारकांना अडचण होते. गायकवाड मळा रस्त्यावरही अशीच परिस्थिती आहे. या मार्गावरही वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे.
उपनगर मार्गावर गतिरोधकाची गरज
नाशिक: उपनगर येथील मार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्याने या रस्त्याचे सौदर्य वाढले आहे. मात्र टाकळीकडून भरधाव वेगाने येणारी वाहने नाशिक-पुणे महामार्गाकडे वळण घेतांना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. टाकळीकडून येणारी वाहने भरधाव येत असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाही. सुदैवाने अनेकदा अपघात टळले असले तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये यासाठी या कॉर्नरवर गतिरोधक टाकावे, अशी मागणी होत आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन
नाशिक: जनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर व पंचवटी माध्यमिक विद्यालय तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष गं.पा. माने, संचालिका सुनंदा माने, अशेाक मुर्तडक, प्रकाश सोनवणे, वासुदेव बधान, संजय बिरारी, मुख्याध्यापक व्ही.के. अहिरे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक मेघा वाघ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले प्रास्ताविक सुरेश आव्हाड यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा पंढरपूरकर यांनी केले. आभार कैलास पवार यांनी मानले.