नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने राज्यात १४४ जागांची मागणी केलेली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. सेनेची मागणी व मिळणाऱ्या जागांचा विचार करता जिल्ह्यात युतीचे जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सन २००९च्या निवडणुकीत जिल्ह्यातील पंधरा जागांपैकी सेनेने स्वत:कडे दहा जागा ठेवून भाजपला पाचच जागा दिल्या होत्या. परंतु बदललेली राजकीय समीकरणे व दोन्ही पक्षांची वाढलेली ताकद पाहता भाजप सेनेकडून कमी जागेवर समाधान मानेल काय किंवा निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांची संख्या लक्षात घेता सेना आपल्या हक्काच्या जागा भाजपला सोडेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.सन २०१४ चा अपवाद वगळता राज्यात शिवसेना-भाजपची कायमच युती राहिली आहे. त्यात शिवसेना मोठा भाऊ असल्यामुळे साहजिकच सेनेच्या वाट्याला नेहमीच जादा जागा आल्या आहेत. जिल्ह्यात १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेची राजकीय ताकद वाढल्यामुळे युतीच्या जागावाटपात सेनेला झुकते माप मिळत गेले. शिवसेना लढवित असलेल्या जागांपैकी निम्म्या जागांवर आजवर विजय मिळत आला आहे. सन २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर युतीच्या जागावाटपाचे सूत्रे बदलली. त्यावेळी सेनेने स्वत:कडे दहा जागा घेतल्या व पाच जागा भाजपसाठी सोडल्या होत्या. त्यात भाजप फक्त बागलाणची जागा जिंकू शकला, तर सेनेने चार जागांवर विजय मिळविला होता.सेना व भाजप दोन्ही पक्षांनी मतदारसंघाची व इच्छुकांचीही चाचपणी केली असून, ज्या जागांवर विद्यमान आमदार आहेत, त्या जागा त्या त्या पक्षांकडे कायम राहतील असे संकेत मिळत आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना राज्यातील निम्म्या जागांची मागणी करीत असून, तोच निकष नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांच्या जागा-वाटपाबाबत लावला, तर २००९च्या फॉर्म्युल्यानुसार भाजप पाच जागांवर समाधान मानेल काय, हाच खरा प्रश्न आहे. २००९ मध्ये भाजपने मालेगाव मध्य, बागलाण, चांदवड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या पाच जागा लढविल्या होत्या. त्यापैकी चांदवड, नाशिक पूर्व व पश्चिम या जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जागा भाजप कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असे मानले जात आहे. मात्र या जागांव्यतिरिक्तआणखी जागांवर भाजपने दावा सांगितला आहे. त्यात प्रामुख्याने नांदगाव, कळवण, बागलाण या तीन मतदारसंघाचा समावेश आहे. या तीन मतदारसंघापैकी गेल्या निवडणुकीत कळवण व बागलाण या दोन मतदारसंघात भाजप अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर होती. आता त्यात नांदगावची भर पडली आहे. गेल्या निवडणुकीत नांदगाव मतदारसंघात शिवसेना दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे शिवसेना ही जागा सोडेल काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, ती जागा सोडली तर सेना त्या बदल्यात नाशिक पश्चिम मतदारसंघाची मागणी करू शकते. मात्र कळवण व बागलाणच्या मोबदल्यात सेनेला कोणतेमतदारसंघ सुटतील याची उत्सुकता कायम आहे.भाजपची ताकद वाढल्याचा दावासन २०१४ मध्ये सेना व भाजप स्वतंत्र लढल्यामुळे दोन्ही पक्षांनी जिल्ह्यातील पंधराही जागांवर उमेदवार उभे केले त्यात भाजपला चार, तर सेनेलाही चार जागांवर विजय मिळाला. सेनेशी युती न करता स्वतंत्र लढल्यामुळे ताकद वाढल्याचा दावा भाजपच्या वतीने केला जात असला तरी, आगामी विधानसभा निवडणुकीत युती करण्याची व जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. ज्या मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार आहेत, त्या मतदारसंघातील जागावाटप कसे होणार याविषयी इच्छुकांना उत्सुकता आहे.
युतीच्या जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:16 AM