नाशिक- महापालिकेची मोफत अंत्यसंस्कार योजना राबवण्यावर खर्च वाढला असून आगामी वर्षांसाठी साडेतीन कोटी रूपये खर्च असून त्यासाठी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव गुरुवारी (दि.१३) रोजी होणाऱ्या महासभेत सादर करण्यात आला आहे. दरम्यान पर्यावरण स्नेही अंत्यसंस्कारासाठी आयुक्त कैलास जाधव प्रयत्न करीत असून त्यामुळेच आता लाकडाचा वापर करून होणाऱ्या अंत्यसंस्कार हे सशुल्क करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
नाशिक महापालिकेची महासभा गुरुवारी (दि.१३) सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने हेाणार आहे. यावेळी मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. तथापि, आता मोफत अंत्यसंस्कार योजनेचा खर्च तर वाढत आहेच, परंतु पारंपरीक पध्दतीने लाकडाचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे विद्युत शवदाहिनी किंवा मोक्ष काष्ठ यांसारख्या पर्यावरण पूरक पध्दतीनेच अंत्यसंस्कार करणाऱ्यांना मोफत सुविधा देण्याचा विचार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. नागरिकांना अशा पध्दतीचा पर्याय दिल्यास लाकडाचा वापर कमी होईल आणि पर्यावरण रक्षण देखील होईल असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
इ्न्फो...
वसंत व्याख्यानमालेच्या अनुदानाचा प्रस्ताव
नाशिक आर्थिक अनियमिततेविषयी धर्मादाय आयुक्तांकडे वाद गेलेल्या नाशिक वसंत व्याख्यानामालेस पुन्हा तीन लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. महापालिकेच्या वतीने अशाप्रकारच्या उपक्रमांना आर्थिक अनुदान दिले जात असले तरी मुळातच कोविडमुळे प्रत्यक्ष व्याख्यानमाला होत नाहीं त्यातच महापालिकेची आर्थिक स्थिती देखील अडचणीची असल्याने महासभा काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.