नाशिक : कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या राज्य सरकारची आर्थिक गाडी रुळावर येत असल्याने मागील महिन्यात आमदारांच्या विकासनिधीचा पहिला टप्पा जिल्ह्यासाठी प्राप्त झाला होता. आता अधिवेशनानंतर दुसऱ्या टप्प्यातील १५ कोटींचा निधी प्राप्त होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील आमदार निधीच्या कामांना चालना मिळणार आहे. दरम्यान, जवळपास सर्वच आमदारांनी विकासकामांचे प्रस्ताव नियोजन विभागाला सादर केले आहेत.
महाविकास सरकारच्या गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात कोरोनामुळे आमदारांचा विकासनिधी गोठविण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांची यादी तयार असली तरी निधीअभावी कामे प्रस्तावित करण्यात आलेली नव्हती. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील आमदारांना प्रत्येकी एक कोटी इतका निधी प्राप्त झाल्यानंतर आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील कामांचे प्रस्ताव तयार केले आहेत. आमदारांना आणखी एक कोटीच्या निधीची प्रतीक्षा असून, अधिवेशनानंतर संबंधित निधी प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारला कोरोनाशी सामना करावा लागला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सत्तेवर आल्यानंतर आमदारांना विशेष बाब म्हणून ५० लाखांना निधी देण्यात आला होता. त्यावेळी आमदारांनी त्यातून विकासकामांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर केले होते. मात्र त्यानंतर मार्च महिन्यात प्रत्येकी ५० लाखांच्या निधीमधून कोविडसाठी खर्च करण्याला प्राधान्य देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले होते; परंतु तोपर्यंत कामांचे प्रस्ताव तयार होऊन वर्कऑर्डरही आल्यामुळे त्याप्रमाणात काेरोनावर निधी खर्च करण्याला मर्यादा आली होती.
गेल्या नोव्हेंबरमध्ये आमदार निधीसाठी प्रत्येकी १ कोटी निधी प्राप्त झाल्याने आमदारांनी विकासकामांचे प्रस्ताव तयार केले आहेत. दोन कोटी निधी असणाऱ्या आमदारांना आणखी एक कोटी निधीची प्रतीक्षा असल्याने अधिवेशनानंतर हा निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी मार्चअखेर हा निधी खर्च करावा लागणार आहे. तूर्तास पहिल्या टप्प्यातील एक कोटी आणि संभाव्य एक कोटी निधीच्या अनुषंगाने आमदार कामांचे प्रस्ताव तयार करीत आहेत. जिल्ह्यातील १५ आमदारांपैकी जवळपास सर्वच आमदारांचे प्रस्ताव नियोजन विभागाला प्राप्त झाले आहेत.