नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री बैठक घेऊन समझौता करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यावर आयुक्त आणि महापालिकेतील पदाधिकारी ठाम असल्याने थेट तोडगा निघाला नाही. करवाढ जाचक पद्धतीने नको, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर महाजन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दिलासा देणार असल्याचे संबंधितांना स्पष्ट केले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुन्या मिळकतींसाठी केलेली करवाढ कमी करून सरसकट ती १८ टक्के करण्यात आली. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमूल्यात सुधारणा केली. त्याचप्रमाणे मोकळ्या भूखंडावरदेखील करआकारणीच्या दरात वाढ झाल्याने शहरात आंदोलन पेटले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना तोडगा काढण्यासाठी एप्रिल महिन्यातच आदेश दिले होते.सर्व निर्णय महापौरांना सांगूनच..आयुक्त लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याची जोरदार टीका झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपण महापौरांशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याचा दावा केला. महापालिकेच्या कर्मचारी आत्महत्या प्रकरणी कर्मचारी आंदोलन पेटवले जात असल्याच्या विषयावर खुद्द आयुक्तांनीच लोकप्रतिनिधींकडे बोट दाखवल्याचे समजते. संबंधित सेना नेत्यास बळजबरी बोलण्यास सांगितले गेले असे थेट आयुक्तांनी सांगितल्याचे समजते. यावरूनही बरीच भवती न भवती झाल्याचे वृत्त आहे.
करवाढ दिलासा मिळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:30 AM