नाशिक : महापालिकेच्या महासभा नेहमीच गाजतात, परंतु शुक्रवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेपूर्वी होणाºया पक्ष बैठकाच यंदा गाजण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीतील फाटाफुटीचे सावट यंदाच्या पक्ष बैठकांवर असून, त्यातच सेंट्रल किचन आणि बससेवेचा ठेका हे विषय गाजण्याची शक्यता आहे.महापालिकेची महासभा शुक्रवारी होणार आहे. त्यात कोणत्या विषयावर कोणते निर्णय घ्यावे यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बैठका गुरुवारी (दि.१९) दुपारी होणार आहे. पक्ष बैठका अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरून गाजत असल्या तरी यंदा महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांतील नगरसेवकांमध्ये फाटाफूट झाल्याची चर्चा होती. महापौरपदाच्या निवडणुकीनंतर सर्वच नगसेवक प्रथमच बंद दाराआड चर्चा करणार असल्याने त्यात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय सध्या महापालिकेत सफाई कामगार भरतीसाठी आउटसोर्सिंग करण्याचा ७७ कोटी रुपयांचा ठेका देणे, सेंट्रल किचन आणि पेस्ट कंट्रोल हे विषय गाजत आहेत. या तिन्ही ठेक्यांची चौकशी करण्यात येत आहे. तथापि, काही ठेक्यांबाबत पक्षापक्षांमध्ये मतभेद असून, काही ठेक्यात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संबंध असल्याने त्यावरूनदेखील वाद होण्याची शक्यता आहे.सेंट्रल किचनच्या विषयाकडे लक्षमहापालिकेने सेंट्रल किचनचा ठेका दिल्यानंतर त्यावरून वाद सुरू आहेत. अनेक राजकीय नेत्यांना आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना त्यात समावून घेतले गेले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी लक्षवेधी दिली असून, गटनेता विलास शिंदे यांनी सेंट्रल किचन रद्द करण्याचा प्रस्तावच महासभेत दिला आहे. त्यामुळे आता या विषयावर महासभेत चर्चा न होता काही तरी ठराव करावा लागणार आहे. भाजप याबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
महासभा पार्टी मिटिंग गाजण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:28 AM